Video : पुणे मेट्रोतील ऑनलाईन तिकीट सेवा ठप्प; स्टेशनवर लांबच लांब रांगा, प्रवाशांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 17:07 IST2026-03-01T17:07:12+5:302026-03-01T17:07:40+5:30
डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या.

Video : पुणे मेट्रोतील ऑनलाईन तिकीट सेवा ठप्प; स्टेशनवर लांबच लांब रांगा, प्रवाशांचा संताप
पुणे - पुण्यातील सर्व मेट्रो स्टेशनवर अचानक ऑनलाईन तिकीट सेवा बंद पडल्याने आज प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. डिजिटल पेमेंटवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्टेशनवर लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या.
प्रवाशांची मेट्रो स्टेशनच्या तिकीट काऊंटरसमोर मोठी गर्दी दिसून आली. सकाळच्या गर्दीच्या वेळी ही समस्या अधिक तीव्र झाली. अनेकांनी वेळेअभावी प्रवास रद्द केल्याचीही माहिती मिळाली. या दरम्यानचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.
अचानक सेवा ठप्प; नेमके कारण अस्पष्ट
मेट्रो प्रशासनाकडून अद्याप अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी तांत्रिक बिघाडामुळे ऑनलाईन तिकीट प्रणाली बंद पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही स्टेशनवरील तिकीट मशीनही कार्यरत नसल्याने काऊंटरवरच तिकीट काढण्याचा पर्याय उपलब्ध राहिला. मागील काही वर्षांत विमान, बस, रेल्वेपासून रोजच्या प्रवासापर्यंत सर्व तिकीट व्यवहार ऑनलाईन होत असल्याने प्रवाशांची सवयच डिजिटल पेमेंटची झाली आहे. अशात अचानक सेवा ठप्प झाल्याने पुणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
ऑनलाईन सेवा बंद पडली तरी पर्यायी व्यवस्था हवी होती. अशा प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी व्यक्त केल्या.
प्रशासनाकडून उपाययोजना अपेक्षित
प्रवाशांनी भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी मजबूत तांत्रिक व्यवस्था, बॅकअप प्रणाली आणि त्वरित सूचना देण्याची मागणी केली आहे. ऑनलाईन सेवा लवकर सुरू करण्यासाठी मेट्रो प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत आहे.