Video : “मी जर विषय काढला तर केंद्रातील मंत्रीपद जाऊ शकतो!” अमोल बालवडकरांचा भाजपला थेट इशारा
By किरण शिंदे | Updated: February 13, 2026 17:51 IST2026-02-13T17:49:58+5:302026-02-13T17:51:24+5:30
अमोल बालवडकर यांच्या या इशाऱ्यानंतर पुणे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

Video : “मी जर विषय काढला तर केंद्रातील मंत्रीपद जाऊ शकतो!” अमोल बालवडकरांचा भाजपला थेट इशारा
पुणे - “माझ्याकडे एक असा विषय आहे की, मी तो योग्य वेळी काढला आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला, तर भाजपच्या केंद्रातील एका मंत्र्याचे निलंबन होऊ शकते,” असा अप्रत्यक्ष इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिला आहे.. अमोल बालवडकर यांच्या या इशाऱ्यानंतर पुणे शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या बंडखोरांवर भारतीय जनता पक्षाने कारवाई केली. पुणे शहरातील तब्बल ६९ कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यामध्ये अमोल बालवडकर यांचाही समावेश आहे.. याच पार्श्वभूमीवर बोलताना बालवडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बालवडकर म्हणाले की, “आम्ही आता शांत बसलो आहोत. आम्ही निवडून आलो असून जनतेची कामे करायची आहेत. अजित पवार यांच्या निधनामुळे आम्ही आधीच दुःखात आहोत आणि खचलेलो आहोत. अशा परिस्थितीतही आम्ही काम करत आहोत. त्यामुळे ‘हकालपट्टी’ किंवा ‘निलंबन’ असे अपमानास्पद शब्द वापरू नयेत. या कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी काम केले आहे, याची जाणीव भाजपच्या नेत्यांनी ठेवावी.”
अमोल बालवडकर २०१७ मध्ये ते भारतीय जनता पक्षाकडून बाणेर परिसरातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती. मात्र भाजपने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर बालवडकर यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने त्यांचे तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला आणि पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले.