Video : अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊर येथे भाविकांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:02 IST2026-01-06T18:02:39+5:302026-01-06T18:02:48+5:30
गणरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी भक्तिभावाने श्री चिंतामणी चरणी नतमस्तक होऊन मनोकामना अर्पण केल्या.

Video : अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊर येथे भाविकांची अलोट गर्दी
उरुळी कांचन : पौष महिन्यातील पवित्र अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आज श्री चिंतामणी देवस्थान थेऊर येथे भाविकांनी पहाटेपासून मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. गणरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह विविध भागांतून आलेल्या भाविकांनी भक्तिभावाने श्री चिंतामणी चरणी नतमस्तक होऊन मनोकामना अर्पण केल्या.
पहाटे पुजारी महेश आगलावे यांच्या हस्ते विधिवत श्रींची अभिषेक पूजा पार पडली. त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवस्थानचे विश्वस्त मा. श्री केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या असून, भाविकांनी शांततेत व शिस्तीत दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानच्या वतीने मंदिर प्रांगणात तसेच मंदिराबाहेर भव्य मांडव उभारण्यात आले होते. दर्शनबारी व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय करण्यात आली होती. दुपारी उपवास करणाऱ्या भाविकांसाठी देवस्थानतर्फे उपवासाची खिचडी वाटप करण्यात आली, ज्याचा भाविकांनी लाभ घेतला.
पौष महिन्यातील पवित्र अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आज श्री चिंतामणी देवस्थान थेऊर येथे भाविकांनी पहाटेपासून मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती. #pune#moregav#GaneshChaturthi#maharashtrapic.twitter.com/TDVmALJspi
— Lokmat (@lokmat) January 6, 2026
सायंकाळी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. चिंतामणी भजनी मंडळाच्या साथीत ह.भ.प. देठे महाराज शास्त्री (पैठण) यांचे सुभाष्य कीर्तन संपन्न झाले. कीर्तनादरम्यान भक्तिरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. चंद्रोदयानंतर श्री चिंतामणीचा भक्तिभावाने छबिना काढण्यात आला. छबिन्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण उत्सव काळात देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस स्वतः लक्ष ठेवून होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान व्यवस्थापन, ग्रामस्थ व स्वयंसेवकांच्या संयुक्त प्रयत्नांतून पौष अंगारकी चतुर्थीचा हा उत्सव भक्ती, सेवा व सुव्यवस्थेचे उत्तम उदाहरण ठरला.