Video : बाल्कनीत अडकलेल्या तरुणांच्या मदतीला धावला डिलिव्हरी बॉय;अशी केली दोन मित्रांची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:20 IST2026-01-07T12:20:11+5:302026-01-07T12:20:45+5:30
Pune News : त्या सूचनांनुसार डिलिव्हरी बॉयने मुख्य दरवाजा उघडून बाल्कनीचा दरवाजा उघडला. अखेर दोघांची सुखरूप सुटका होते आणि ते डिलिव्हरी बॉयचे आभार मानतात.

Video : बाल्कनीत अडकलेल्या तरुणांच्या मदतीला धावला डिलिव्हरी बॉय;अशी केली दोन मित्रांची सुखरूप सुटका
पुणे : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये पुण्यातील दोन मित्र रात्री तीनच्या सुमारास घराच्या बाल्कनीत अडकतात आणि सुटकेसाठी लढवलेली त्यांची अनोखी शक्कल पाहून सोशल मीडिया युजर्स त्यांचे कौतुक करत आहेत.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मिहीर गाहुकर या युजरने शेअर केला आहे. मिहीर आणि त्याचा मित्र रात्री तीन वाजता घराच्या बाल्कनीत गेले असताना चुकून दरवाजा लॉक झाला. घरात कोणीच नसल्याने आणि उशिराची वेळ असल्याने ते दोघे अडचणीत सापडले.
या परिस्थितीत त्यांनी भन्नाट कल्पना लढवली. त्यांनी ‘ब्लिंकिट’ अॅपवरून काही सामान ऑर्डर केले. काही वेळात डिलिव्हरी बॉय इमारतीजवळ आल्यानंतर त्यांनी त्याला आपण बाल्कनीत अडकल्याची माहिती दिली. रात्रीच्या वेळी अडचण समजून घेत डिलिव्हरी बॉयने मदत करण्यास तत्परता दाखवली.
व्हिडिओमध्ये पुढे हे दोघे मित्र डिलिव्हरी बॉयला घराची चावी कुठे ठेवली आहे, मुख्य दरवाजा कसा उघडायचा याबाबत सूचना देताना दिसतात. त्या सूचनांनुसार डिलिव्हरी बॉयने मुख्य दरवाजा उघडून बाल्कनीचा दरवाजा उघडला. अखेर दोघांची सुखरूप सुटका होते आणि ते डिलिव्हरी बॉयचे आभार मानतात.
या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी बहुतांश युजर्स ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या तत्परतेचे आणि मदतीच्या वृत्तीचे कौतुक करत आहेत. काहींनी त्याला ‘खरा हिरो’ असेही म्हटले आहे.