यशवंत कारखान्याच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ, जमीन विक्रीवरून वादंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 19:44 IST2025-09-28T19:43:35+5:302025-09-28T19:44:40+5:30
वादावादी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात संचालक मंडळाने सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले.

यशवंत कारखान्याच्या सभेत अभूतपूर्व गोंधळ, जमीन विक्रीवरून वादंग
उरुळी कांचन / थेऊर : पूर्व हवेलीतील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कोलवडी येथील लक्ष्मी गार्डन येथे अभूतपूर्व गोंधळात पार पडली. कारखान्याच्या जमीन विक्रीच्या मुद्द्यावरून सभासद आणि संचालक मंडळ आमनेसामने आले. वादावादी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात संचालक मंडळाने सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले.
गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या आदेशानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कारखान्याची जमीन २९९ कोटींना विकत घेणार असल्याची चर्चा होती. शासनाने घालून दिलेल्या अटी-शर्तींवरून काही संचालकांनी आक्षेप घेतल्याने या सभेकडे सभासदांचे विशेष लक्ष लागले होते. सभेच्या सुरुवातीला चेअरमन सुभाष जगताप यांनी गेल्या १३-१४ वर्षांतील घडामोडींचा आढावा घेतला. कारखान्याच्या हितासाठी कार्य करणाऱ्यांचा उल्लेख करताना माजी संचालक पांडुरंग काळे यांचा न्यायालयीन लढा निर्णायक ठरल्याचे त्यांनी नमूद केले. शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानेच हा निर्णय शक्य झाला, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मंडळाने कारखान्याच्या खर्चात १०० कोटींची बचत केली असून, बँकांचे कर्ज वन-टाइम सेटलमेंटद्वारे सोडवत असल्याचे त्यांनी सांगितले.
सभासदांचे आक्षेप, गोंधळाला सुरुवात -
कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषयपत्रिका पटलावर मांडली, तेव्हाच गोंधळाला सुरुवात झाली. सभासद विकास लवांडे यांनी मागील सभेच्या इतिवृत्तांतील विसंगती अधोरेखित केली. "मागील सभा केवळ पाच मिनिटांत उरकली होती, मग आज तिचे इतिवृत्त वाचायला २५ मिनिटे का लागत आहेत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, कारखान्याच्या मालकीच्या जमिनीच्या अहवालातील गट क्रमांक आणि संचालक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीला दिलेल्या अंडरटेकिंगमधील गट क्रमांक यामध्ये तफावत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. यावर चेअरमन सुभाष जगताप यांनी ही "प्रिंटिंग मिस्टेक" असल्याचे सांगितले, तेव्हा सभासदांमध्ये हशा पिकला. लवांडे यांनी कारखान्याची जमीन सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी दराने विकली जात असल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. संचालक मंडळ अनेक महत्त्वाच्या बाबी सभासदांपासून लपवत असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.
गदारोळात विषय मंजूर -
सभासदांच्या आक्षेपांमुळे वातावरण तापले असतानाही संचालक मंडळाने गदारोळातच सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले. सभासदांच्या मते, मागील सभेत संचालकांच्या बाजूने आवाज उठवणारे अनेकजण आज बघ्याची भूमिका घेताना दिसले. यामागे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुका, तसेच बाजार समितीच्या कामातील अंतर्गत नाराजी आणि सत्ताकारण ही प्रमुख कारणे असल्याचे सभासदांनी नमूद केले.
शेतकऱ्यांची होरपळ -
अनेक सभासदांच्या मते, कारखाना वाचवण्यासाठी निवडणुका घेण्यात आल्या, परंतु असा गोंधळ पाहून निवडणुका व्यर्थ वाटतात. "कोणीही सत्तेवर आले तरी हेच होणार होते," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बंद पडलेल्या कारखान्याची धुराडी अजूनही धूपत आहे, परंतु कामगार, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे प्रश्न बाजूला पडले आहेत. राजकारणी आपापल्या परीने राजकारण करत असून, यात होरपळला जात आहे तो केवळ शेतकरी. गदारोळात सभेचे सर्व विषय गोंधळात आवाजही मंजूर म्हणून लगेचच चेअरमन सुभाष जगताप यांनी सभा संपली व राष्ट्रगीत स्वतःच म्हणायला सुरुवात केली . सभा संपल्यानंतर यशवंत शेतकरी बचाव कृती समितीचे विकास लवांडे, राजेंद्र चौधरी, लोकेश कानकाटे, अलंकार कांचन, निलेश काळभोर आधी लोकांनी या सभेवर नाराजी व्यक्त करत भाषण केले काही शेतकरी सभासद थांबले होते.