देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात काळाचा घाला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 10:00 IST2026-04-01T09:54:48+5:302026-04-01T10:00:15+5:30
-१२ वर्षांची मुलगी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.

देवदर्शनावरून परतताना दिवे घाटात काळाचा घाला; बाप-लेकीचा जागीच मृत्यू, मुलगा जखमी
पुणे : जेजुरीच्या खंडोबाचे देवदर्शन करून परतताना दुचाकीस्वार वडील आणि मुलांवर काळाने घाला घातला. दिवे घाटात पाठीमागून आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात १२ वर्षांची मुलगी ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर जखमी वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात ८ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.
या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. सुंदर कैलास गंगावणे (वय ३३), मुलगी अनन्या सुंदर गंगावणे (वय १२, दोघे रा. उंड्री पिसोळी, कात्रज कोंढवा रोड) अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. सोहम गंगावणे (वय ८) हा जखमी झाला आहे. याबाबत अश्विनी उत्तम पवार (वय ३०, रा. कमलविहार सोसायटी, धनकवडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंत बाबूराव मलकापुरे (वय ३२, रा. नागेवाडी, ता. शिरुर अनंतपाळ, जि. लातूर) असे अटक झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मामेभाऊ सुंदर गंगावणे हे मुलगी अनन्या व सोहम यांना घेऊन रविवारी खंडोबाच्या देवदर्शनासाठी जेजुरीला गेले होते. तेथून ते मध्यरात्री सव्वा बारा वाजता परतत होते. दिवे घाटातील देवाची उरुळी येथे पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
त्यात सुंदर गंगावणे यांच्या डोक्याला मार लागला. अनन्या गंगावणे ही ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. सुंदर गंगावणे यांना जमलेल्या लोकांनी तातडीने ससून रुग्णालयात नेले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली असून, पोलिस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.