शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची २२ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 19:56 IST2025-09-27T19:54:54+5:302025-09-27T19:56:16+5:30
तक्रारदाराने १२ लाख १० हजारांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना मूळ रक्कम अथवा परतावा न मिळाल्याने तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची २२ लाखांची फसवणूक
पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरांनी दोघांची २२ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड रोड आणि विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिक बाग, सिंहगड रोड परिसरातील ४२ वर्षीय तक्रारदाराला २३ जून ते १८ जुलै या कालावधीत सायबर चोरांनी संपर्क केला. त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास चांगले रिटर्न्स मिळतील, असे आमिष दाखवले. सुरुवातीला काही प्रमाणात नफा दाखवून, आणखी गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तक्रारदाराने १२ लाख १० हजारांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना मूळ रक्कम अथवा परतावा न मिळाल्याने तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) कदम करत आहेत. दुसऱ्या घटनेत, विमाननगर परिसरातील ४७ वर्षीय तक्रारदाराला ११ ते १८ ऑक्टोबर दरम्यान सायबर चोरांनी संपर्क साधत प्ले स्टोअरवरून एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. तक्रारदाराने १० लाख १० हजार रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने विमानतळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर करत आहेत.