पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 20:17 IST2025-12-04T20:16:09+5:302025-12-04T20:17:50+5:30
- पालिकेच्या रूग्णवाहिकेत डॉक्टर उपलब्ध नाही

पालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू
पुणे :पुणे महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी पालिकेत रुग्णवाहिका होती, पण त्या रुग्णवाहिकेत डॉक्टर नव्हते. त्यातील एका कर्मचाऱ्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. एका महिला कर्मचाऱ्याला दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत अधिकारी-कर्मचारी असतात. त्याचबरोबर शेकडो नागरिक रोज येत असतात. त्यामुळे पालिकेच्या मुख्य इमारतीत कायमस्वरूपी रुग्णवाहिका असावी, तसेच पालिकेच्या कार्यालयीन वेळेत किमान एक डॉक्टर असावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार पालिकेच्या मुख्य इमारतीत रुग्णवाहिका उभी असते, पण त्यामध्ये डॉक्टर नसतात.
पुणे महापालिकेत सकाळी ११.३० च्या सुमारास पथविभागात काम करणारे शिपाई अशोक दशरथ वाळके (वय ५८) यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना पालिकेतील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. चार तासांनंतर वाळके यांचे निधन झाले. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास लेखा (अकाउंट) विभागातील महिला कर्मचारी छाया सूर्यवंशी यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने प्राथमिक उपचार करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कार्डिअॅक रुग्णवाहिका आणि किमान डॉक्टर असणे आवश्यक
पुणे महापालिकेत रुग्णवाहिका असते, पण ती कार्डिअॅक रुग्णवाहिका नसते. या रुग्णवाहिकेत डॉक्टर असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्याचबरोबर पालिकेत एक कायमस्वरूपी छोटे आरोग्य केंद्र असावे, अशीही मागणी केली जात आहे.