Pune Local Train Update: पुणे-लोणावळा मार्गावर तब्बल तीन तास रेल्वे सेवा ठप्प;प्रवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:56 IST2026-01-06T12:49:52+5:302026-01-06T12:56:23+5:30
Pune Local Train Update: दुपारी साडेतीनच्या सुमारास तळेगावजवळ मालगाडीचे इंजिन अचानक बंद पडले. या मार्गावर फक्त एक अप आणि एक डाऊन लाइन असल्याने मालगाडी ट्रॅकवरच अडकून पडली.

Pune Local Train Update: पुणे-लोणावळा मार्गावर तब्बल तीन तास रेल्वे सेवा ठप्प;प्रवाशांना मनस्ताप
पिंपरी : मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे इंजिन तळेगाव रेल्वे स्थानकाजवळ बंद पडल्याने सोमवारी (दि. ५) पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर मोठा खोळंबा झाला. देहूरोड ते तळेगाव दरम्यानच्या या घटनेमुळे एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या सुमारे तीन तास थांबून राहिल्या. परिणामी, हजारो प्रवाशांना, विशेषतः कामगार आणि विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
दुपारी साडेतीनच्या सुमारास तळेगावजवळ मालगाडीचे इंजिन अचानक बंद पडले. या मार्गावर फक्त एक अप आणि एक डाऊन लाइन असल्याने मालगाडी ट्रॅकवरच अडकून पडली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्यांचे संचालन ठप्प झाले. यात दुपारी तीनची पुणेलोकल, डेक्कन एक्स्प्रेस, इंदूर एक्स्प्रेस, नागरकोईल एक्स्प्रेस, दुपारी ३.४७ ची तळेगाव लोकल, कोयना एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस तसेच सायंकाळी ४.२५ आणि ५.२० च्या लोणावळा लोकलचा समावेश आहे. या सर्व गाड्या देहूरोड ते शिवाजीनगर दरम्यान विविध ठिकाणी थांबवण्यात आल्या.
पुणे-लोणावळा मार्गावर दुपारी १२ ते ३ या वेळेत लोकल सेवा बंद असते. त्यानंतर धावणारी पहिलीच तीनची लोकल मध्येच अडकल्याने त्यातील प्रवाशांना विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांना इच्छितस्थळी पोहोचण्यास विलंब झाला.
रेल्वे प्रशासनाकडे दुसरा पर्याय नसल्याने गाड्या थांबवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. अखेर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास लोणावळ्याहून दुसरे इंजिन आणून मालगाडी बाजूला करण्यात आली. त्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली. तीन तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गाड्या पुढे सरकल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
तिसऱ्या-चौथ्या लाइनची गरज
या घटनेमुळे पुणे-लोणावळा मार्गावरील रेल्वे सेवेची नाजूक अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रवासी संघटनांकडून या मार्गाच्या तिसऱ्या-चौथ्या लाइनचा प्रकल्प लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
- सायंकाळची ४.५५ ची तळेगाव-पुणे लोकल ६.२० वाजता आकुर्डीत आली. त्यामुळे प्रवासाला उशीर झाला. - प्रतीक बेडकर, प्रवासी