नागरिकांच्या सेवेत ५ दस्त नोंदणी कार्यालये टॉप फाइव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 13:13 IST2025-10-12T13:13:26+5:302025-10-12T13:13:46+5:30
- नोंदणी विभागाचा ‘गुणांकन’ फॉर्म्यूला यशस्वी; शहरातील सर्वच २७ कार्यालयांच्या कामात गतिमानता

नागरिकांच्या सेवेत ५ दस्त नोंदणी कार्यालये टॉप फाइव्ह
पुणे : दुय्यम निबंधक कार्यालयांमधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये अधिक गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने मागील महिन्यात लागू केलेल्या गुणांकन पद्धतीमुळे कामाला वेग आला आहे. या प्रणालीअंतर्गत दुय्यम निबंधक यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. त्यात शहरातील हवेली क्रमांक ७, १०, १३, २१ आणि २३ या पाच कार्यालयांनी दस्त नोंदणी, स्कॅनिंग, ई-रजिस्ट्रेशन, ई मोहोर यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे.
नव्या गुणांकन पद्धतीमुळे दस्त नोंदणी, स्कॅनिंग, ई-रजिस्ट्रेशन, ई-मोहोर आणि इतर कामकाजासाठी अधिकाऱ्यांना निश्चित वेळेची मर्यादा पाळणे बंधनकारक झाले. या प्रणालीअंतर्गत दुय्यम निबंधक यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये शहरातील सर्वच २७ कार्यालयांच्या कामकाजात गतिमानता आली आहे. याबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहजिल्हा निबंधक संतोष हिंगणे म्हणाले, ‘सेवांमध्ये होणाऱ्या विलंबाला आळा घालणे आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेला प्रोत्साहन देणे हा या गुणांकन पद्धतीचा मुख्य उद्देश होता. ११ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत या २७ कार्यालयांतील कामांचे मूल्यमापन करण्यात आले. या गुणांकन पद्धतीमध्ये नेमून दिलेली कामे मुदतीत पूर्ण न झाल्यास वजा गुण देण्याची तरतूद होती. मात्र सर्वच २७ कार्यालयांनी अधिक गुण मिळवले. यातील पाच कार्यालयांनी चांगले काम केल्याबद्दल या कार्यालयांना लवकरच स्वतंत्र प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. पुढील काळात सर्व कार्यालयांनी आपल्या कामकाजात सुधारणा करून गुणांकन वाढवावे आणि नागरिकांना जलद सेवा द्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत.’
..हे आहेत टॉप फाइव्ह
शहरातील हवेली क्रमांक ७च्या दुय्यम निबंधक रोहिणी भिल्लारे, क्रमांक १०चे दुय्यम निबंधक तानाजी पाटील, हवेली क्रमांक १३चे दुय्यम निबंधक विनोद कासेवाड, हवेली क्रमांक २१चे दुय्यम निबंधक दिनकर देशमुख आणि हवेली क्रमांक २३च्या दुय्यम निबंधक मीनल मोरे या अधिकाऱ्यांनी त्यांच्या दस्त नोंदणी, स्कॅनिंग, ई-रजिस्ट्रेशन, ई-मोहोर यामध्ये उल्लेखनीय काम केले आहे.