Sinhagad Fort: सिंहगडावर थरारक बचावकार्य..! युवक ३५० फूट दरीत कोसळला, ५ तासांच्या मोहिमेनंतर सुखरूप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:33 IST2026-03-20T12:20:53+5:302026-03-20T12:33:06+5:30
पुणे : सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक पण तितकीच दिलासा देणारी घटना घडली आहे. कात्रज ते सिंहगड या पायी ...

Sinhagad Fort: सिंहगडावर थरारक बचावकार्य..! युवक ३५० फूट दरीत कोसळला, ५ तासांच्या मोहिमेनंतर सुखरूप बाहेर
पुणे : सिंहगड किल्ला परिसरात एक धक्कादायक पण तितकीच दिलासा देणारी घटना घडली आहे. कात्रज ते सिंहगड या पायी मार्गावर चालत असताना एका डॉक्टर युवकाचा पाय घसरून तो तब्बल ३५० फूट खोल दरीत कोसळला. मात्र हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला. जखमी युवकाचे नाव डॉ. प्रशांत नंदवते (वय ४०, रा. कोल्हेवाडी) असे असून ते सध्या सुखरूप आहेत. त्यांच्या अंगावर किरकोळ जखमा असून प्रकृती स्थिर आहे. या दरम्यानचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. नंदवते हे खेडशिवापूर येथील रुग्णालयात जात असताना रुग्ण उशिरा येणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी वेळ घालवण्यासाठी कात्रज-सिंहगड ट्रेक मार्गावर चालायला सुरुवात केली. संध्याकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास “चिलीमचा खड्डा” परिसरात त्यांचा पाय घसरला आणि ते खोल दरीत कोसळले. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ ११२ वर कॉल करून मदत मागितली.
५ तासांची थरारक बचावमोहीम
घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोरांच्या सहाय्याने दरीत उतरत बचावकार्य करण्यास सुरुवात केली. पथकातील तानाजी भोसले यांनी दरीत उतरून नंदवते यांना सुरक्षितपणे वर आणले. सुमारे ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री उशिरा ही मोहीम यशस्वी झाली. या धाडसी आणि वेळेवर केलेल्या कारवाईमुळे एक जीव वाचला असून हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.