शेवाळेवाडी चौकात थरार; पेट्रोल टँकरला आग लागली, पण जवानांच्या तत्परतेने मोठा स्फोट टळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:15 IST2025-11-10T17:15:25+5:302025-11-10T17:15:38+5:30
शेवाळेवाडी चौकामध्ये पेट्रोल टँकरला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती

शेवाळेवाडी चौकात थरार; पेट्रोल टँकरला आग लागली, पण जवानांच्या तत्परतेने मोठा स्फोट टळला
पुणे : पेट्रोल आणि डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास हडपसरजवळील शेवाळेवाडी चौकात घडली. त्यावेळी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा धोका टळला असून, इंधनाला आग लागून होणारे संभाव्य नुकसान टळले आहे.
शेवाळेवाडी चौकामध्ये पेट्रोल टँकरला आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार हडपसर, काळेपडळ, बी. टी. कवडे रोड आणि खराडी अग्निशमन केंद्राचे वॉटर टँकर रवाना करण्यात आले. घटनास्थळी जवानांनी पाहणी केली असता टँकरने अगदी चौकातच रस्त्यावर केबिनने पेट घेतल्याने धोका निर्माण होता. जवानांनी तत्परतेने आगीवर पाण्याचा मारा करत आग टँकरमधील पेट्रोल व डिझेलला लागणार नाही, याची खबरदारी घेतली. त्यानंतर, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचल्याने व जवानांनी बजावलेले कर्तव्यामुळे मोठा धोका टळला.
आग लागल्यानंतर टँकरचालक घाबरल्याने वाहनातून उडी मारून बाहेर पडल्यामुळे बचावला. टँकरमध्ये १५ हजार लिटर डिझेल आणि ५ हजार लिटर पेट्रोलचा साठा होता. टँकर चालक इंधन घेऊन लोणी येथून जात होता. ही कामगिरी अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे, नीलेश लोणकर व वाहनचालक नारायण जगताप, राजू शेख आणि तांडेल शौकत शेख तसेच फायरमन बाबा चव्हाण, चंद्रकांत नवले, रामदास लाड, अविनाश ढाकणे या जवानांनी केली. अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचत जवानांनी दाखवलेली सतर्कता यामुळे मोठी हानी टळली अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले.