महापालिका शाळांमध्ये तिसरा डोळा; सीसीटीव्हीसाठी ४ कोटी खर्चाच्या पूर्वगणनपत्रकास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 14:42 IST2025-10-12T14:41:36+5:302025-10-12T14:42:49+5:30
बदलापूर येथे शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती

महापालिका शाळांमध्ये तिसरा डोळा; सीसीटीव्हीसाठी ४ कोटी खर्चाच्या पूर्वगणनपत्रकास मान्यता
पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेच्या सर्व ३०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे ९१ शाळांमध्ये ८६२ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात ९० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून, त्यासाठी ४ कोटींच्या पूर्वगणनपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.
बदलापूर येथे शाळेत विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत शासनाने राज्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही लावण्याचा आदेश दिला होता. महापालिकेच्या शाळांमध्ये यापूर्वीच सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. बदलापूर येथील घटनेनंतर महापालिकेने जुन्या हद्दीसह समाविष्ट ३२ गावांत एकूण ३०० शाळांचा विद्युत विभाग आणि शिक्षण विभागाने एकत्रितपणे सर्वेक्षण केले. यामध्ये शाळेच्या इमारतीमध्ये किती खोल्या आहेत, किती मजले आहेत, मोकळी जागा, प्रवेशद्वार किती आहेत, याची माहिती घेण्यात आली. या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.
याच्या पहिल्या टप्प्यात ९१ शाळांमध्ये ८६२ सीसीटीव्ही बसवण्यात आले असून, आता आणखी ९० शाळांमध्ये ४ कोटी रुपये खर्च करून नव्याने सीसीटीव्ही बसवले जाणार आहे. यानंतर देखली १५० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम बाकी राहणार असून, तेथे देखील टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही बसवले जाणार असल्याची माहिती विद्युत विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.
दरम्यान, खासगी तसेच शासकीय शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये तेथे काम करणारे कर्मचारी, शिक्षक, बसचालक यासह अन्य लोकांकडून मुलींना लक्ष्य केले जाते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्राधान्याने सीसीटीव्ही बसविण्यासाठी मुलींच्या शाळांची निवड केली जाणार आहे.
शहरात महापालिकेच्या सुमारे ३०० हून अधिक शाळा आहेत. सुमारे दीडशे इमारतींमध्ये त्या भरतात. काही शाळांना मोठी मैदानेही आहेत. तेथे सुरक्षारक्षक नेमले असले तरी त्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शाळांच्या परिसरात कचरा टाकणे, शाळेतील साहित्य चोरणे, मैदानात रात्रीच्या वेळी मद्यपी तसेच नशेखोरांचा वावर असणे, गुन्हेगारी कृत्य करणे अशा प्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे शाळांचे नुकसान टाळणे तसेच हे गैरप्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत.