...तर विद्यापीठ रॅंकिंगच्या यादीतूनही हाेईल हद्दपार; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 10:14 IST2025-09-10T10:14:22+5:302025-09-10T10:14:36+5:30

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कमध्ये यंदा विद्यापीठ ३७ व्या स्थानावरून थेट ९१ व्या स्थानावर खाली आले आहे.

pune news then the university will also be expelled from the ranking list; Students express concern | ...तर विद्यापीठ रॅंकिंगच्या यादीतूनही हाेईल हद्दपार; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

...तर विद्यापीठ रॅंकिंगच्या यादीतूनही हाेईल हद्दपार; विद्यार्थ्यांनी व्यक्त केली चिंता

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असलेल्या सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाने जागतिक क्रमवारीत दर्जा सुधारला, पण राष्ट्रीय मानांकनात आहे ते स्थानदेखील टिकवू शकले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच काैतुकांचा साेहळा साजरा करणाऱ्या विद्यापीठाला आता टिकेला सामाेरे जावे लागत आहे.

राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कमध्ये यंदा विद्यापीठ ३७ व्या स्थानावरून थेट ९१ व्या स्थानावर खाली आले आहे. ही घसरण विद्यापीठ प्रशासनाला विचार करायला लावणारी आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी प्रतिनिधींनी व्यवस्थापन परिषद सदस्यांची भेट घेऊन व्यथा मांडली. हे असेच सुरू राहिले तर पुढील वर्षी टाॅप शंभर युनिव्हर्सिटीच्या यादीतही पुणे विद्यापीठ दिसणार नाही, अशी भीतीही व्यक्त केली.

विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळावे, राष्ट्रीय मानांकनात झालेल्या घसरणीची जबाबदारी घेऊन कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, प्राध्यापक भरतीतील कथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी, विद्यापीठातील प्रभारी‘राज’ संपवावे, विविध विद्यार्थी संघटना प्रतिनिधी व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, मुलींच्या सुरक्षिततेवर भर देत तत्काळ उपाययाेजना कराव्यात आदी मागण्या केल्या. तसेच पीएच. डी. प्रवेश प्रक्रिया आणि पोस्ट डॉक्टरल फेलाेशिप यातील गोंधळाकडे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांचे लक्ष वेधले. तसेच मंगळवारी (दि. ९) दुपारी हाेणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या नियाेजित बैठकीत वरील प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची मागणी केली. याची दखल घेत व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे, बागेश्री मंठाळकर, देविदास वायदंडे, धोंडोराम पवार, रवींद्र शिंगणापूरकर, संदीप पालवे, संगीत जगताप आणि राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर आदीनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्याची ग्वाही दिली.

विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न व्यवस्थापन परिषदेत चर्चिला जावा. तसेच विद्यापीठाच्या दर्जांमध्ये हाेणारी घसरण ही गंभीर बाब आहे, त्यावर ठाेस निर्णय व्हावेत. राष्ट्रीय मानांकनात ३७ वरून ९१ झालेली घसरण अत्यंत चिंताजनक आहे. याबाबत कुलगुरूंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.  - राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती  

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रँकिंग घसरणे धक्कादायक आहे. विद्यापीठाचे प्रमुख म्हणून कुलगुरूंनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. याबाबत आम्ही सर्व मागण्या व्यवस्थापन परिषद सदस्यांना भेटून सांगितल्या आहेत. - नितीन आंधळे, विद्यार्थी प्रतिनिधी

अवघ्या काही दिवसांवर परीक्षा आली तरी अद्याप वसतिगृहाचा प्रश्न सुटला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही याेग्य दखल घेतली जात नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मंगळवारी व्यवस्थापन परिषद सदस्यांची बैठक हाेणार हाेती. दुबार पदव्युत्तर पदवी करत आहे म्हणून वसतिगृह प्रवेश नाकारलेले आम्ही सर्व विद्यार्थी सकाळीच विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात एकत्र आलाे. व्यवस्थापन परिषद सदस्यांकडे आमचे म्हणणे मांडले. - अभिषेक शेलकर, विद्यार्थी प्रतिनिधी

विद्यापीठाचे रँकिंग सुधारले पाहिजे यासाठी सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, सिनेट व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदीनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी ठाेस पावले उचलत लवकरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करून ‘अकार्यक्षम कुलगुरू हटाव’ची मागणी करणार आहोत - ओंकार बेनके, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (पश्चिम महाराष्ट्र)

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कच्या (एनआयआरएफ) मानांकनात ३७ व्या स्थानावरून थेट ९१ व्या स्थानी पाेहाेचले. काही वर्षांपूर्वी १६ व्या स्थानी असलेले पुणे विद्यापीठ आता सिम्बायोसिससारख्या अभिमत विद्यापीठाच्या जवळपासही दिसत नाही. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. असेच सुरू राहिले तर पुढील वर्षी यादीतही नाव दिसणार नाही. याला सर्वाधिक जबाबदार कुलगुरू, प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि अधिसभा सदस्य आहेत. - कल्पेश यादव, सह-सचिव, युवा सेना

 

Web Title: pune news then the university will also be expelled from the ranking list; Students express concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.