जलसंपदा विभागही करणार कालव्याचे सर्वेक्षण; उन्हाळी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर कार्यवाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:35 IST2026-03-25T11:35:19+5:302026-03-25T11:35:19+5:30
- बंद दिवसांचा अवधी आवर्तनात वाढवून मिळणार

जलसंपदा विभागही करणार कालव्याचे सर्वेक्षण; उन्हाळी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर कार्यवाही
पुणे : खडकवासला धरणाचा उजवा कालवा मुंढव्यातील शिंदे वस्तीजवळ फुटल्यानंतर पाण्याचा प्रवाह बंद करण्यासाठी दगड मातीच्या भरावाने बुजविण्यात आला होता. हा भराव काढून शास्त्रोक्त पद्धतीने बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी पुढील तीन ते चार दिवसांचा कालावधी लागेल. तोपर्यंत ग्रामीण भागासाठी सुरू असलेले आवर्तन बंद करण्यात आले आहे. भरावाचे काम पूर्ण झाल्यानंतर आवर्तन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. दरम्यान कालवा फुटीच्या घटना टाळण्यासाठी आवर्तन संपल्यानंतर संपूर्ण कालव्याचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
खडकवासला धरणाच्या नवीन उजवा मुठा कालव्यास मुंढवा भागातील शिंदे वस्तीत (किलोमीटर २२) सोमवारी (दि. २३) अचानक भगदाड पडल्यामुळे सुमारे २ कोटी लिटर पाणी (२० एमएलडी) वाया गेले. कालव्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच जलसंपदाच्या खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर खडकवासला धरणातून कालव्यावाटे वाहणारे पाणी बंद केले.
धरणापासून भगदाड पडलेल्या ठिकाणापर्यंत २२ किलोमीटर अंतरातील पाणी वाया गेले. हे पाणी सुमारे २० एलएलडी होते. कालवा फुटलेल्या ठिकाणी तातडीने दगड, माती यांचा भराव टाकण्यात आला. त्यामुळे पाणी थांबले. त्यानंतर मंगळवारी (दि. २४) हा भराव पुन्हा काढण्यात आला. त्यात शास्त्रोक्त पद्धतीने मातीचा थर त्यावर दगडांचा थर घालून त्याचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी पुढील तीन ते चार दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागासाठी उन्हाळी आवर्तन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कालवा फुटल्याने बंद करण्यात आलेले आवर्तन काही दिवस बंद होणार आहे. आवर्तनातील हे बंद दिवस वाढवून देण्यात येणार आहेत. उन्हाळी आवर्तन २५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार होते. त्यात बंद दिवसांचा अवधी वाढून ते ३० एप्रिलपर्यंत चालेल
कालवा फुटल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यास तीन ते चार दिवसांचा अवधी लागेल. त्यानंतर त्याठिकाणी अस्तरीकरण करण्यात येणार आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी संपूर्ण कालव्याचे सर्वेक्षण करण्यात येईल. अशा कमकुवत ठिकाणी भराव तसेच अस्तरीकरण करून त्याची दुरुस्ती करण्यात येईल. उन्हाळी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल. - किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, खडकवासला प्रकल्प