विजयस्तंभावर एकात्मतेचा संदेश देणारी फुलांची सजावट होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 13:18 IST2025-12-27T13:18:28+5:302025-12-27T13:18:35+5:30
या संकल्पनेनुसार यंदाच्या विजयस्तंभ सजावटीत सुमारे २ हजार किलो कृत्रिम व नैसर्गिक फुलांचा वापर करण्यात येणार आहे.

विजयस्तंभावर एकात्मतेचा संदेश देणारी फुलांची सजावट होणार
कोरेगाव भीमा : पेरणे फाटा येथील विजयस्तंभ शौर्य दिन कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरू असून, १ जानेवारी रोजी २०८ वा शौर्य दिन साजरा केला जाणार आहे. यंदा विजयस्तंभावर एकात्मता, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रीय ऐक्याचा संदेश देणारी भव्य फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘भारतीय संविधान अमृत महोत्सव’अंतर्गत २६ नोव्हेंबर २०२४ ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘घर घर संविधान’ आणि ‘हमारा संविधान, हमारा स्वाभिमान’ या उपक्रमांद्वारे संविधानाची मूल्ये जनतेपर्यंत पोहोचवली जात आहेत. या संकल्पनेनुसार यंदाच्या विजयस्तंभ सजावटीत सुमारे २ हजार किलो कृत्रिम व नैसर्गिक फुलांचा वापर करण्यात येणार आहे.
सजावटीत ‘सत्यमेव जयते’, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचा ठळक संदेश देण्यात येणार असून, भारतीय तिरंगा विशेष आकर्षण ठरणार आहे. निळ्या रंगाच्या फुलांमधून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र, भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह, अशोक स्तंभ आणि ‘सत्यमेव जयते’ घोषवाक्य साकारण्यात येणार आहे.
सजावटीच्या खालच्या भागात तिन्ही बाजूंना महार रेजिमेंटचे चिन्ह, तर समोरील बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साली विजयस्तंभास दिलेल्या भेटीचे तैलचित्र असणार आहे. सजावटीसाठी झेंडूच्या कृत्रिम व नैसर्गिक फुलांसह भगवा, हिरवा, निळा, पिवळा, पांढरा आणि लाल रंगाच्या फुलांचा वापर केला जाणार आहे.
२७ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सजावटीला सुरुवात होणार असल्याची माहिती विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी दिली. या सजावटीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, बार्टीचे महासंचालक सुनील वारे आणि निबंधक विशाल लोंढे यांनी मान्यता दिली आहे.
अनुयायांच्या संकल्पनेतून ही सजावट साकारली जात असून, यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेना महाराष्ट्र प्रमुख युवराज बनसोडे, सच्चितानंद कडलक, दीपिका भालेराव, नीलेश गायकवाड, दीक्षांत भालेराव, आकाश शिंदे आदी उपस्थित होते.
फुलांच्या सजावटीतून सामाजिक संदेश
दरवर्षी विजयस्तंभाची सजावट नैसर्गिक फुलांच्या माध्यमातून केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक व कृत्रिम फुलांच्या माध्यमातून सजावट करत सामाजिक व संविधानिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.