मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वेचा वेग मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 18:09 IST2025-10-14T18:08:48+5:302025-10-14T18:09:58+5:30
- वेळेवर सिग्नल न मिळाल्याने निर्धारित वेळेपेक्षा गाड्या धावताहेत पाच ते सहा तास उशीर

मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वेचा वेग मंदावला
पुणे : दिवाळी, छठपूजेमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पुणे रेल्वे विभागातून उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी दानापूर, गोरखपूर, राणी विरंगुळ, हिसार या ठिकाणी विशेष (स्पेशल) रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत; परंतु या स्पेशल गाड्यांमुळे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. परिणामी, या जादा गाड्यांमुळे रेल्वेचा वेग मंदावल्याने गावी जाणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल सुरूच असून, निर्धारित वेळेपेक्षा काही गाड्या पाच ते सहा तास उशिरा धावत आहेत.
नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त बाहेरील राज्यांतून पुण्यात राहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पुणे स्थानकावरून दररोज दीड लाखाहून जास्त नागरिक प्रवास करतात. परंतु आता दिवाळी आणि छठपूजेमुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दीडपटीने वाढ झाली आहे. परिणामी, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिकांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. वेळेवर धावणाऱ्या रेल्वेमुळे प्रवासी एक-दोन तास अगोदर स्थानकावर येऊन बसतात. त्यामुळे स्थानकावर प्रचंड गर्दी होत आहे; परंतु अपुऱ्या जागेमुळे कित्येक प्रवाशांना रणरणत्या उन्हात बाहेर थांबण्याची वेळ आली आहे. सध्या एसटी, रेल्वे, ट्रॅव्हल्स या सर्व गाड्या फुल्ल भरून जात आहेत. शिवाय पुणे रेल्वे विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मार्गांवर स्पेशल रेल्वे सोडण्यात आली आहे. यामुळे वेळेत सिग्नल न मिळाल्याने गाड्यांना उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
प्रशासनाकडून उपाययोजना
पुणे स्थानकावर वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय गर्दी नियंत्रणाची व्यवस्था आणि रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त तिकीट तपासणीस तैनात केले आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी काही वेळा क्षमतेपेक्षा जास्त तिकीट विक्री करण्यात येत आहे. परंतु मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना उशीर होत असल्याने स्थानकावर गर्दी होत आहे. विशेषत: उत्तर प्रदेश आणि बिहार जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे.
आझाद हिंद, दानापूर, झेलम या प्रमुख गाड्यांना लेटमार्क
पुणे विभागातून धावणाऱ्या आझाद हिंद, दानापूर, झेलम, गोरखपूर, लखानाै या प्रमुख नियमित गाड्या आहेत. शिवाय गाड्या प्रवाशांची बारा महिने गर्दी असते; परंतु स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यामुळे या महत्त्वाच्या गाड्यांना काही वेळा सिग्नल मिळत नाही. त्यामुळे या गाड्या साइडला थांबविल्या जात आहेत. त्यामुळे या गाड्या ऐन दिवाळीत कधी पाच तास, तर कधी आठ तास उशिराने धावत आहेत.
दिवाळीमुळे रेल्वेला गर्दी वाढली आहे. त्यामुळे दोन महिने अगोदर आरक्षण करूनही प्रवाशांना सुखरूप प्रवास करता येईना. तसेच जनरल तिकीट काढून प्रवास करणारे आरक्षण डब्यात घुसत आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रवाशांवर कडक कारवाई करावी. शिवाय गाड्या वेळेवर धावण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. - आनंद सप्तर्षी, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती