परतीच्या मार्गावरील तुकोबांची पालखी आळंदीत आणावी;आळंदी देवस्थानचे देहू देवस्थानला निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 10:59 IST2025-07-13T10:55:17+5:302025-07-13T10:59:00+5:30

दरम्यान, २८ जुलै २००८ रोजी तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीत आणण्यात आला होता.

pune news the palanquin of the Tukobas on the return journey should be brought to Alandi; Alandi Devasthan invites the body to the Devasthan | परतीच्या मार्गावरील तुकोबांची पालखी आळंदीत आणावी;आळंदी देवस्थानचे देहू देवस्थानला निमंत्रण

परतीच्या मार्गावरील तुकोबांची पालखी आळंदीत आणावी;आळंदी देवस्थानचे देहू देवस्थानला निमंत्रण

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून, तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे. आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत केले जाणार असल्याचा पत्रात उल्लेख आहे. दरम्यान, २८ जुलै २००८ रोजी तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीत आणण्यात आला होता.

माऊलींची पालखी येत्या रविवारी (दि. २०) आळंदीत दाखल होणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत यावा, असे निमंत्रण देवस्थानाकडून देण्यात आले आहे. याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे आणि विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिंधर महाराज मोरे यांना दिले आहे. परंपरेप्रमाणे, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीस जाणे महत्त्वाचे मानले जाते. पूर्वी संत तुकाराम महाराज आळंदीत माऊलींचे दर्शन घेऊन पंढरपूरला मार्गस्थ होत असत. त्यांच्या पश्चात, त्यांचे पुत्र तोपनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला.

१६८५ पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ते आळंदीत येत. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन पुढे पंढरपूरला प्रस्थान करत. नंतर ही परंपरा खंडित झाली. त्यानंतर गुरु हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ मध्ये स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला आणि दोन्ही संतांच्या पालख्यांचे मार्ग वेगळे झाले. दोन्ही पालखी सोहळ्यांत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या दोन संतांची भेट होण्यासाठी, या वर्षी सोहळा आळंदीत नेण्याची मागणी वारकऱ्यांच्या वतीने आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली आहे.

दोन्ही देवस्थानांच्या विश्वस्तांमध्ये सखोल चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असून, आळंदीत स्वागताची तयारी सुरू आहे. पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा यापूर्वी २८ जुलै २००८ रोजी झाला होता.

Web Title: pune news the palanquin of the Tukobas on the return journey should be brought to Alandi; Alandi Devasthan invites the body to the Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.