कामे अजूनही बाकीच; सिंहगड रस्त्यावरच्या उड्डाणपुलाची दुसरी बाजू बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:47 IST2025-08-20T15:46:48+5:302025-08-20T15:47:04+5:30

पीएमपीएल'च्या बंद पडलेल्या गाड्या, त्यामुळे तयार होत असलेली वाहनकोंडी अशा सर्वच स्तरांवर या रस्त्यांचे शब्दशः बारा वाजले

pune news the other side of the flyover on Sinhagad Road remains closed | कामे अजूनही बाकीच; सिंहगड रस्त्यावरच्या उड्डाणपुलाची दुसरी बाजू बंदच

कामे अजूनही बाकीच; सिंहगड रस्त्यावरच्या उड्डाणपुलाची दुसरी बाजू बंदच

पुणे :महाराष्ट्रदिनी उद्घाटन करण्यात आलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू अजूनही बंदच आहे. त्यामुळे धायरीकडून राजाराम पुलाकडे येताना लाखो वाहनधारकांचे दररोज हाल होत आहेत. चिंचोळा रस्ता, त्यावरचे खड्डे, पर्यायी रस्त्यांवरून थेट या मुख्य रस्त्यावर येणारी वाहने, 'पीएमपीएल'च्या बंद पडलेल्या गाड्या, त्यामुळे तयार होत असलेली वाहनकोंडी अशा सर्वच स्तरांवर या रस्त्यांचे शब्दशः बारा वाजले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाच्या एका बाजूचे उद्घाटन होत असताना या पुलाकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसते आहे. दररोज लाखो वाहनधारकांना वाहनकोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातच पावसाने या त्रासात भर टाकली आहे. पुलाच्या कामासाठी म्हणून रस्त्याची रुंदी कमी

झाली आहे. पदपथावरचे बसथांबे, महावितरणचे खांब यामुळे त्याबाजूनेही रस्ता अरुंद झाला आहे. मधल्या चिंचोळ्या रस्त्यातून वाट काढताना वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडते. त्यातच रस्त्यावरचे खड्डे वाहनधारकांची दररोज परीक्षा पाहतात. पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडे रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी असताना त्याच्याकडून त्याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. महापालिकेच्या नियंत्रणाखाली काम सुरू आहे. मात्र, कोणीही प्रशासकीय अधिकारी कधीही इकडे फिरकताना दिसत नाही.

राजाराम पूल ते थेट फन टाइम थिएटर असा हा पूल आहे. त्याची राजाराम पुलाकडून धायरीकडे जाणारी बाजू सुरू करण्यात आली. मात्र, धायरीकडून राजाराम पुलाकडे येणाऱ्या बाजूचे काम अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे धायरीकडून येणाऱ्या वाहनधारकांना दररोज अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. ही बाजू कधी सुरू करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. काम झाले आहे; मात्र राज्यस्तरावरील नेत्याची वेळ मिळत नसल्याने विलंब अशी टीका होत आहे.


महापालिकेचे निवेदन
महापालिकेच्या पथविभागाने सिंहगड रस्त्याच्या उड्डाणपुलाची धायरीकडून राजाराम पुलाकडे येणारी बाजू खुली करण्याविषयीचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ही बाजू सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, पुलासाठी द्यायचा विशिष्ट रंग, (थर्माप्लास्टिक पेंट), वाहतुकीसंबधीच्या खुणा (साईनबोर्ड), विद्युत खांब व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक अशी काही कामे बाकी आहेत. त्याशिवाय, वाहतूक विभागाने अपघात टाळण्याच्या दृष्टीने सुचवलेली काही कामे करणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ही कामे करता येणे अशक्य झाले आहे. तरीही प्रलंबित सर्व कामे तातडीने पूर्ण करून पुलाचा हा भाग वाहतुकीस खुला करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

Web Title: pune news the other side of the flyover on Sinhagad Road remains closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.