तरुणांची नशा, फक्त ढोल-ताशा..! शहरात घुमतोय ढोल-ताशाचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 09:46 IST2025-08-30T09:45:34+5:302025-08-30T09:46:04+5:30

- नवनवीन ठेक्यांच्या सादरीकरणासाठी वादक उत्सुक

pune news the intoxication of the youth, only the sound of drums and drums The sound of drums and drums is echoing in the city | तरुणांची नशा, फक्त ढोल-ताशा..! शहरात घुमतोय ढोल-ताशाचा आवाज

तरुणांची नशा, फक्त ढोल-ताशा..! शहरात घुमतोय ढोल-ताशाचा आवाज

-हिरा सरवदे

पुणे :
स्पीकरसमोर डान्स करणारी तरुणाई मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात ढोल-ताशा पथकांकडे वळू लागली आहे. तरुण-तरुणींमध्ये ढोल-ताशा पथकाची क्रेझही वाढत असल्याने तरुणांची नशा, फक्त ढोल-ताशा, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आप्पासाहेब पेंडसे यांनी सुरू केलेली ढोल पथकाची परंपरा पुण्याच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. सुरुवातीस शाळांशी निगडित असलेल्या ढोल पथकांचा विस्तार आता शहर व उपनगरांसह पिंपरी चिंचवड शहरातही वाढला आहे. आजमितीला शहरात जवळपास २०० ते २५० ढोल पथके कार्यरत आहेत. या सर्व पथकांमध्ये जवळपास २५ ते २७ हजार तरुण-तरुणी वादक म्हणून सहभागी झाले आहेत. बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचणारे तरुण ढोल पथकांच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सवात सहभागी होताना दिसतात.

तरुणांमधील ऊर्जेला शिस्तबद्ध पद्धतीने वाट देण्याचे काम ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून केले जाते. असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून ढोल पथकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पथकांच्या विरोधातील तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा ढोल पथकांवर निर्बंध किंवा बंदी घालण्याची मागणी केली जाते. जर तसे झाले तर ही तरुणाई आपल्यातील ऊर्जा बाहेर काढण्यासाठी कोणते तरी नवीन माध्यम शोधेल, हे विसरून चालणार नाही.

ढोल-ताशा तयारीची लगीनघाई

गणेशोत्सवासाठी गेल्या दीड-दोन महिन्यांपासून शहर व उपनगरांमध्ये ढोल पथकांचा सराव सुरू आहे. गणेश प्राणप्रतिष्ठेच्या मिरवणुकांमध्ये नवीन वादकांनाही वादन करण्याची संधी मिळालेली आहे. आता सर्व वादकांना गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. सरावादरम्यान शिकलेले ताल गणेशभक्तांना ऐकवण्यासाठी वादक आतुर आहे.

पथकांचा जोर संकल्पनेवर आधारित (थीम ओरिएंटेड)

ढोल पथकांकडून आजवर गाण्यांच्या चालींवर वादन करण्याकडे कल असे. मात्र, मागील दोन-तीन वर्षांपासून पथकांचा जोर हा संकल्पनेवर आधारित (एखादी थीम घेऊन) वादनावर जास्त आहे. पथकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी, संभाजी महाराज, जय मल्हार, महाकाल यावर आधारित वेशभूषा व वादने केली जात आहेत. वादनामध्ये नवनवीन चाली, ताल, संबळ, दिमडी, ड्रमसेट यांचा वापर केला जात आहे.

मिरवणुकीत ऐकायला मिळणार हे ताल

एक ते सहा, रामजी की सवारी, नवीन पोपट, महाकाल, लावणी, ताल, झी-गौरव, भांगडा, राम लखन, रावडी राठोड, भजनी, इंद्रजीमी जम्बपर, फुलगाव, तिहाई, नवीन व जुना गावठी, धमार, कावड, देवीचा ठेका, जोगन, कच्ची बाजा आणि आणखी काही.

पथकांची संख्या का वाढली 

एक पथक एका तासाच्या वादनासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये सुपारी घेते. तसेच एक मिरवणूक दोन ते तीन तासांपेक्षा कमी नसते. त्यामुळे एक पथक एका मिरवणुकीच्या माध्यमातून किमान एक लाख रुपये कमवते. गणेशोत्सवामध्ये एक पथक किमान दहा मिरवणुका करते. तर मोठी पथके वीस-वीस मिरवणुका करतात. शिवाय स्थिर वादनाच्या सुपारी घेतात. यातून पथकांना लाखो रुपये मिळवतात. हा पैसा वादकांच्या कष्टातून मिळतो. शिवाय पथक ही सामुदायिक संकल्पना असल्याने पथकांची नोंदणी धर्मादाय आयुक्त कार्यालयांकडे होणे, त्या पथकाने वार्षिक उत्पन्न व खर्चाचा हिशेब धर्मादाय कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील केवळ ३० ते ३५ ढोल पथकांचीच नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे आहे. त्यामुळे इतर ढोल पथकांची कमाई थेट पथक प्रमुखांच्या खिशात जाते. एखाद्या वादकाने पथकाच्या कमाईवर किंवा हिशेबावर साधी चर्चा जरी केली, तरी त्याला पथकातून काढले जाते. मग तो इतरांना सोबत घेऊन नवीन पथक उभे करतो. या कमाईमुळे पथकांची संख्या वाढली आहे आणि यापुढेही वाढताना दिसेल.

नोंदणीसाठी वेगळी व्यवस्था नाही

धर्मादाय कार्यालयात ४५ ते ५० हजार विविध संस्था नोंदणीकृत असून, ढोल-ताशा पथकांच्या नोंदणीसाठी वेगळी व्यवस्था नाही. इतर संस्थांप्रमाणे पथकांची नोंद होते. शहरात किती पथके कार्यरत आहेत, याची नेमकी माहिती आमच्याकडे नाही. पथकांनी स्वतः नोंदणी करून घ्यायला हवी. नोंदणी नसलेल्या पथकाबाबत कोणी लेखी तक्रार केली, तर तपास करून कारवाई केली जाईल.


सहभागी युवापिढीला रुपयाचीही अपेक्षा नसते 

ढोल-ताशा पथक हे तरुण वर्गाचे आकर्षण झाले आहे. त्यातून त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे रुपयाचीही अपेक्षा न ठेवता पथकप्रमुख बोलावतील, त्यावेळी येऊन ते सांगतील ती कामे करतात. मात्र, याचाच फायदा घेऊन काही लोक पथकांकडे व्यवसाय म्हणून आहेत. वादकांना वडापाव, पाण्याची बाटली, जेवण देऊन त्यांच्या शक्तीवर व आनंदावर लाखो रुपये कमवत आहेत. पथकांकडून वादकांना ओळखपत्र सुद्धा दिले जात नाही. गळ्यातील पथकाच्या ओळख पत्रासाठी वादकाला पैसे मोजावे लागतात, शिवाय गणवेश, टिपरू, शूज, गादी अशा वस्तू स्वत: विकत घ्याव्या लागतात. मिरवणुकीसाठी एखाद्या पथकाने ड्रेसची थीम ठरवली असेल तर त्या ड्रेसचे पैसे सुद्धा वादकालाच द्यावे लागतात.

आता यंदा होणार काय?

पुण्यातील गणेशोत्सवामध्ये होणारे ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादाने ढोल पथकातील ढोलांची संख्या तीसपेक्षा अधिक असू नये; तसेच याचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश ३० ऑगस्ट २०२४ रोजी दिले होते. या निर्णयाच्या विरोधात युवा वाद्य ढोल पथकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती. न्यायालयाच्या या निर्णयाचे पुण्यातील ढोल-ताशा पथकांनी आणि गणेशभक्तांनी जोरदार स्वागत केले. यामुळे विसर्जन मिरवणुकीत एका पथकामध्ये २० पासून १२०-१५० पर्यंत ढोलची संख्या पाहायला मिळाली. आता यावर्षी ‘एक मंडळ, एक पथक’ अशी मागणी शहरातील काही नागरिकांनी प्रशासनाच्या विविध बैठकांमध्ये मांडली होती. त्याअनुषंगाने पोलिस प्रशासनानेही मंडळांना व पथकांना तसे आवाहन केले आहे. यावर काहींनी सहमतीही दर्शवली आहे. मात्र, यंदाच्या गणेश प्राणप्रतिष्ठा मिरवणुकीमध्ये ‘एक मंडळ, एक पथक’ पाहायला मिळाले नाही. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत एका मंडळाच्या निवडणुकीत किती पथके व एका पथकात किती ढोल वाजणार, हे पाहावे लागणार आहे.


रुग्णांना त्रास

माझ्या घरात एक हृदयविकाराचा रुग्ण आहे. घराशेजारीच ढोल पथक सराव करते. त्याच्या आवाजाचा त्रास होताे. त्यामुळे ढोलच्या ठोक्यासोबत आमच्याही हृदयाचे ठोके वाढतात. तक्रार करायची तर कोणाकडे? केली तर रोष पत्करावा लागेल, त्यामुळे शांत बसावे लागते, अशी प्रतिक्रिया शनिवार पेठेतील एका नागरिकाने दिली आहे; तसेच शहरातील अनेक रुग्णालयांच्या शेजारी ढोल पथकांचे सराव चालतात. त्यामुळे ढोल-ताशाच्या आवाजाचा त्रास रुग्णालयातील रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना सहन करावा लागतो.

असा येतो खर्च

- ढोलची पिंप - २००० ते २५०० रुपये
- कातडी पान - ७०० ते ८०० रुपये
- दोरी, कडीसह एका ढोलसाठी ५ ते ६ हजार रुपये खर्च येतो.
- सर्वसाधारण ताशा - ८ ते ९ हजार रुपये
- गंगा जमुना ताशा - १२ ते १४ हजार रुपये
- चिकोडी ताशा - १७ ते १८ हजार रुपये

मुंबईमधील मंडळांनी पुण्यात केला पथकांचा विस्तार

तीस वर्षांपूर्वी मुंबईत ढोल-ताशा पथक सुरू केल्यांनतर हळूहळू पथकांनी इतर शहरांतही पाय रोवले आहेत. पुणे ही सांस्कृतिक राजधानी आणि पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा होणारा जल्लोष पाहून काही पथकप्रमुखांनी पुण्यातही शाखा सुरू केल्या आहेत. एका पथकात जवळपास ५०० वादक असतात, त्यानुसार इतर शहरांत देखील वादनाच्या सुपाऱ्या घेतल्या जात असून, १५०-१५० वादकांचा ग्रुप करून विविध मंडळांमध्ये वादनासाठी वादकांना स्वतःची बस करून पाठविले जात आहे.

पुण्यात ढोल पथकांची क्रेझ वाढत आहे. शहरातील पथकांची संख्या १८० च्या आसपास आहे. ढोल- ताशाचे वादन हे तबल्यासारखे नाही. हे सामूहिक वादन आहे. ढोलवर टिपरू आदळल्यानंतर आवाज निघणार आहे. या आवाजाचा त्रास थोड्याफार प्रमाणात होणारच आहे. मात्र, हा त्रास स्पिकरच्या भिंतींपेक्षा वेगळा आहे. या आवाजाचा कानांवर परिणाम होत नाही, हा आवाज हवेमध्ये नाहीसा होतो. आवाजाच्या बाबतीत ज्या तक्रारी आहेत, त्यावर सामंजस्याने मार्ग काढता येऊ शकतो. - पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ.

दरवर्षी हजाराहून अधिक मुलं-मुली उत्साहाने सहभागी होतात आणि आम्ही पाच वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून वादन करतो. आमच्या पथकाची वार्षिक उलाढाल साधारण २० ते २२ लाख रुपयांपर्यंत पोहोचते. त्यातील आवश्यक खर्च भागवून उरलेला निधी आम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना देतो. याशिवाय विविध सामाजिक कार्यक्रमही आम्ही सातत्याने राबवतो. - संकेत सातपुते, वादक, समर्थ प्रतिष्ठान, ढोल पथक


आमच्या पथकात साधारण एक महिना पंधरा दिवस आधीच वादनाच्या तालमींना सुरुवात होते. इच्छुकांनी सहभागी व्हावे, यासाठी आम्ही आमच्या फेसबुक पेजवर आव्हान करतो. नवीन प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक मुला-मुलींकडून २०० रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जाते. शुल्क घेण्याचे कारण अनेकदा काही जण दोन-तीन दिवस येतात आणि नंतर सोडून देतात. प्रवेश शुल्कातून जमा झालेले पैसे आवश्यक वस्तूंवर आणि ओळखपत्रासाठी वापरले जातात. त्यामुळे सर्वांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होते आणि वादन करताना पथकाची एकसंधता टिकून राहते. - मयूर उत्तेकर, वादक, राजमुद्रा ढोल-ताशा पथक


पथकात प्रवेश घेण्यासाठी सर्वप्रथम इच्छुकांनी ऑनलाइन गुगल फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑफलाइन फॉर्म देखील भरावा लागतो. त्यामुळे सहभागींची माहिती व्यवस्थित जतन होते आणि पुढील व्यवस्थापन सोपे होते.

गणवेश हा प्रत्येकाने स्वतःच्या खर्चातून आणायचा असतो. ओळखपत्र, टिपरू आणि इतर वाद्ये ही पथकाकडूनच पुरवली जातात. - दर्शन फडणीस, वादक, शिव साम्राज्य पथक, वादक

Web Title: pune news the intoxication of the youth, only the sound of drums and drums The sound of drums and drums is echoing in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.