निर्णय स्थानिक पातळीवर..! महाविकास आघाडीबाबत हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:31 IST2025-09-27T17:30:51+5:302025-09-27T17:31:42+5:30
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक

निर्णय स्थानिक पातळीवर..! महाविकास आघाडीबाबत हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
पुणे - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढायची की युती किंवा आघाडीच्या माध्यमातून लढायची, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे स्वातंत्र त्या-त्या जिल्ह्यातील व तालुक्यातील नेत्यांना देण्यात आले आहे. आमचा हा निर्णय महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही कळवल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हानिहाय आढावा बैठक झाली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ बोलत होते. या बैठकीस सपकाळ यांच्यासह पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, सह प्रभारी बी. एम. संदिप, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेतील गटनेते व निरीक्षक सतेज (बंटी) पाटील, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी आदींसह पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी, जिल्हा व तालुका अध्यक्ष, आजी माजी पदाधिकारी, विविध आघाड्या व सेलचे प्रमुख उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, पक्ष संघटना वाढणे ही, प्रत्येक राजकीय पक्षाची गरज आहे. त्यानुसार आधी पक्ष आणि नंतर निवडणूक असा विचार होणे महत्वाचे. मात्र, युती व आघाडीमध्ये पक्ष वाढीला फटका बसतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर की युती,आघाडीमध्ये लढायची,याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आले आहे. आमचा हा निर्णय आम्ही महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनाही कळवला आहे.
सतेज पाटील म्हणाले, राहुल गांधी यांनी मत चोरीच्या माध्यमातून खिडकी उघडली आहे, आता आपल्याला दार उघडायचे आहे. तीन महिन्यात निवडणुका संपणार आहेत, त्यामुळे सर्वांनी सोशल मिडियावर सक्रिय होणे गरजेचे आहे. तसेच पदविधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका लागणार आहेत. त्या दृष्टीने आपण पदविधर नोंदणी करणे गरजेचे आहे.
राहुल गांधींनी महाराष्ट्राचा दौरा करावा - खा. शिंदे
महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला, नागरिकांना सरकारने अद्याप मदत केलेली नाही. असा परिस्थितीमध्ये काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचा दौरा करून शेतकऱ्यांशी व नागरिकांशी संवाद साधावा, यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने प्रयत्न करावेत. तसेच लोकसभा निवडणुकीत आम्ही एकसंघ काम केल्याने यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत आम्हाला अति आत्मविश्वास व तिकीट वाटपातील गोंधळ यामुळे नुकसान झाले. हा गोंधळ जाणीवपूर्वक निर्माण केला गेला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र आम्ही मत विभाजन टाळून चांगले यश संपादित करू. यावेळीही मतचोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे मतदार याद्या तपासणे गरजेचे आहे, असे मत खा. प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केले.