महापालिकेत ‘आवो-जावो’चा सिलसिला सुरूच;पालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना रान मोकळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:43 IST2025-10-14T17:43:31+5:302025-10-14T17:43:42+5:30
- दोन तास उशिरा यायचे अन् तीन वाजताच घराचे वेध; पालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना रान मोकळे

महापालिकेत ‘आवो-जावो’चा सिलसिला सुरूच;पालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांना रान मोकळे
पुणे : अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्यावर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने महापालिकेच्या सर्वच विभागांमध्ये ‘आवो-जावो घर तुम्हारा’, असे चित्र असते. महापालिकेतील या विदारक स्थितीवर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर निर्बंध घालण्याचे व योग्य त्या उपाय योजना करण्याचे जाहीर केले होते. मात्र, दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही चित्र बदलण्याचे नाव घेत नाही.
राज्य शासनाने शासकीय कार्यालयांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्यानंतर कामाचे तास वाढविले आहेत. त्यानुसार महापालिकेची कार्यालयीन वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित केली आहे. शिपाई व सेवकांनी पंधरा मिनिटे अगोदर येणे बंधनकारक आहे. एक-दोन शिपाई सोडले तर कोणीही दहाच्या अगोदर कार्यालयांमध्ये येत नाहीत. अनेक अधिकारी व कर्मचारी सकाळी उशिरा म्हणजे ११, ११:३०, १२ वाजेपर्यंत कार्यालयात येतात आणि सायंकाळी चारपासूनच घरी जाण्याची तयारी सुरू करतात. दुसरीकडे, वरिष्ठांना कल्पना न देता कार्यालयातून दिवसभर गायब होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.
या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने दोन दिवस महापालिकेतील पाहणी करून याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी यावर निर्बंध आणण्याचे व योग्य त्या उपाय योजना करण्याचे जाहीर केले होते. मात्र, मागील दोन महिन्यापासून कसलेही चित्र बदलले नाही.
आजही एक-दोन शिपाई सोडले, तर सकाळी दहापूर्वी कोणीही कार्यालयात येत नाही. साडेदहाच्या पुढे कार्यालयात कर्मचारी-अधिकारी येण्यास सुरुवात होते. कर्मचारी दुपारी १२ पर्यंत निवांतपणे येतात. त्यानंतर दुपारी चारपासूनच घरी जाण्याचे वेध लागलेले असते. कर्मचारी आणि अधिकारी केव्हा कार्यालयात येतात, केव्हा जातात?, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी विभागप्रमुखांची असताना, अनेक विभागप्रमुख स्वतःच गायब असतात. त्यामुळे कारवाई करायची कुणी, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे महापालिका भवनातील सर्वच विभागांमध्ये ‘कधीही या आणि कधीही जा’चा सिलसिला सुरूच आहे.
बायोमेट्रिकच्या भीतीने होत होती गर्दी
काम चुकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी बायोमेट्रिकच्या वेळेनुसार वेतन करण्याचा निर्णय घेतला. कार्यालयीन वेळ कमी भरल्यास वेतन कापण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे धास्तावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेळेत बायोमेट्रिक हजेरी लावण्यासाठी रांगा लावत होते. मात्र, बिनवडे यांची बदली झाल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंच्चावन्न सुरू झाले. त्यातच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बसवलेल्या यंत्रणेची निविदा संपल्याने मागील तीन महिन्यापासून सर्व कारभार हजेरीविनाच सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नवीन इमारत झाली वॉकिंग प्लाझा
महापालिकेत सध्या प्रशासक राज आहे. त्यामुळे नवीन विस्तारित इमारतीमधील पदाधिकाऱ्यांची कार्यालये बंद आहेत. त्यामुळे नवीन इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर नागरिकांची वर्दळ कमी असते. याचाच फायदा महिला कर्मचाऱ्यांकडून घेतला जात आहे. दुपारी जेवण केल्यानंतर या मजल्यावर महिला कर्मचारी तास न् तास वॉकिंग करत असतात. त्यामुळे हा मजला वॉकिंग प्लाझाच झाला आहे.
पालकमंत्र्यांनी लक्ष घालणे गरजेचे
राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार हे शिस्तप्रिय राजकारणी व राज्यकर्ते म्हणून सर्वत्र परिचित आहेत. मात्र, त्यांच्याच जिल्ह्यामध्ये त्यांच्या हद्दीतील महापालिकेमध्ये अधिकारी व कर्मचारी बेशिस्तपणे वर्तन करत असल्याने पालकमंत्र्यांनीच लक्ष घालणे गरजेचे आहे.