विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा..! बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:18 IST2025-10-14T15:18:00+5:302025-10-14T15:18:13+5:30
शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा हाेणार आहेत.

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा..! बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून, दहावीची २० फेब्रुवारीपासून होणार
पुणे :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीख घाेषित केली आहे. त्यानुसार, इयत्ता बारावीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ दरम्यान, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६दरम्यान हाेणार आहे. सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी केले आहे.
शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा हाेणार आहेत.
अधिक माहितीनुसार, बारावी परीक्षा मंगळवार, दि. १० फेब्रुवारी ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ दरम्यान हाेणार आहे. याचदरम्यान माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांच्या ऑनलाइन परीक्षा पार पडणार आहेत. त्याचबराेबर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसफयूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा शुकवार, दि. २३ जानेवारी ते सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येणार आहेत.
इयत्ता दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी ते बुधवार, दि. १८ मार्च २०२६ दरम्यान पार पडणार आहे. त्याचबराेबर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन तसेच एनएसफयूएफ अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा साेमवार, दि. २ फेब्रुवारी ते बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घेण्यात येतील, असे मंडळाने जाहीर केले आहे. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षांसह ही परीक्षा पार पडणार आहे. विद्यार्थ्यांचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षांच्या तारखा आधीच जाहीर केल्या आहेत. परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असेही मंडळाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.