भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 21:40 IST2026-02-25T21:36:24+5:302026-02-25T21:40:01+5:30
- पारंपरिक दगडांत केवळ चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार
पुणे : पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असून, सुमारे पावणे तीन हजार चौरस फुटांच्या सभा मंडपाचे काम केवळ चार महिन्यांत पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण करण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे जीर्णोद्धाराचे काम पुरातत्त्व विभागामार्फत करण्यात येत असून, दगडातील हे बांधकाम गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारीही याला अनुकूल असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. यासाठी २८८ कोटी १७ लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. तर केवळ सभामंडपासाठी १० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. या ऐतिहासिक सभामंडपाची पुनर्बांधणी हा सांस्कृतिक, स्थापत्य आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. कमी वेळेत पारंपरिक साहित्य व तंत्रांचा वापर करून, उत्कृष्ट कारागिरीच्या साहाय्याने पूर्ण झालेला हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर आदर्श ठरणार असून, याची जागतिक पातळीवर नोंद व्हावी, यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज करण्यात येणार आहे.
या मंदिराच्या सभा मंडपाचे काम पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आले आहे. हा सभामंडप दगडांच्या साहाय्याने पारंपरिक तंत्रज्ञानातून बनविला जात आहे. या सभामंडपात एकूण ४८ स्तंभ असून, मध्यभागी घुमट तयार करण्यात येणार आहे. या सभामंडपाचे एकूण क्षेत्र २ हजार ७५० चौरस फूट इतके असेल. यातील स्तंभ दोन ते तीन दगडांमध्ये पूर्ण करण्यात येणार असून, स्तंभांवर कमानी उभारल्या जाणार आहेत. या कमानीदेखील तीन दगडांमध्येच पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यावर असलेला घुमट हादेखील तशाच पद्धतीने उभारला जाणार आहे. हा सभा मंडप तयार करण्यासाठी केवळ चार महिन्यांचा कालावधी लागणार असून, हे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.
वारसा जतन करणे ही जागतिक पातळीवरील चळवळ आहे. अशा प्रकारचे प्रकल्प अनेक देशांत राबविले गेले आहेत. त्यात कंबोडियातील प्राचीन मंदिरांचे संवर्धन, श्रीलंकेतील ऐतिहासिक स्थळांचे जतन, जपानमधील पारंपरिक लाकडी वास्तू पुनर्बांधणी, रोमन व ग्रीक पुरातत्त्वीय स्थळांचे संवर्धन, इटलीतील ऐतिहासिक इमारतींचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. भीमाशंकर प्रकल्प या जागतिक परंपरेशी सुसंगत आहे.
या सभामंडपाचे काम ९ जानेवारी रोजी सुरू करण्यात आले असून, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ चार महिन्यांच्या काळात हे काम पूर्ण होणार आहे. यासंदर्भात लंडन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार एका सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्या देखरेखीखाली काम पूर्ण करण्यात येणार आहे.
भीमाशंकर मंदिराच्या कामाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश होणे केवळ पुण्याच्याच नव्हे, तर राज्याच्या व देशाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे. ही नोंद निश्चित होईल याची खात्री आहे. - जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी