पुणे शहरातील पूरस्थितीवरून ठाकरे-वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2026 12:35 IST2026-04-05T12:34:35+5:302026-04-05T12:35:02+5:30

- मागील ४ वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरिक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत.

pune news thackeray vadettiwar target BJP over flood situation in Pune city | पुणे शहरातील पूरस्थितीवरून ठाकरे-वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा

पुणे शहरातील पूरस्थितीवरून ठाकरे-वडेट्टीवारांचा भाजपवर निशाणा

पुणे : शहर व परिसरात तीन दिवस झालेल्या विशेषतः गुरुवारी झालेल्या पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले, नागरिकांच्या घरांत, दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले, मोठ्या प्रमाणात झाडे पडली. अंगावर झाड पडल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेचे नेते व माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि काँग्रेस नेते व विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. समाजमाध्यमांतील ‘एक्स’ हॅण्डलवर त्यांनी टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, पुण्यात झालेला पाऊस ‘क्लाउड बर्स्ट’ किंवा ४ तासांत झालेल्या अत्यंत जास्त पर्जन्याच्या श्रेणीतला नव्हता, मात्र या पावसाने प्रशासनाचे अपयश अधोरेखित केले. पाणी तुंबण्यामागे एखादी अचानक घडलेली घटना कारणीभूत नाही. मागील ४ वर्षांपासून पर्यावरणतज्ज्ञ, शहरी नियोजक, अभियंते, नागरिक सातत्याने विनाशाकडे नेणाऱ्या प्रकल्पांविरोधात आवाज उठवत आहेत आणि उपायही सुचवत आहेत. नदी सुशोभीकरण, चुकीच्या ठिकाणी उभारलेले मेट्रो खांब, नदीपात्रातील अतिक्रमणे, नदीच्या रेड आणि ब्लू फ्लड लाइन्समध्ये केलेले बदल, वेताळ टेकडीच्या नाशाचा प्रस्ताव, हे अव्यवहार्य प्रकल्प आहेत. फक्त काँक्रीट ओतणे म्हणजे विकास नाही. गेल्या दशकभरापासून पुण्यात ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असूनही, हा कथित विकास प्रत्यक्षात संकटच ठरत आहे. हा तथाकथित विकास असाच सुरू राहिला तर पुण्याला अशा परिस्थितींना नेहमीच सामोरे जावे लागेल आणि ‘विकासा’च्या नावाखाली केवळ मृगजळ दाखवले जाईल. मी २०२१ मध्ये पर्यावरणमंत्री असताना नदी सुशोभीकरण प्रकल्प थांबवून तो पुण्याच्या गरजेनुसार पुन्हा आखण्याचे निर्देश दिले होते. मात्र, आता निर्णय सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे.

विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, पुणेकरांनी भाजपला अगदी भरभरून दिले. ६ आमदार, ११९ नगरसेवक, १ खासदार, भाजपचे एक केंद्रीय मंत्री, राज्यातील एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री पुणे शहरात राहतात. असे असताना अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसात या शहराची दैना उडाली. ‘स्मार्ट सिटी पुणे’ आता ‘वॉटर किंगडम’कडे वाटचाल करत आहे. इतर वेळी ‘क्रेडिट’ घेण्यासाठी पुढे येणारे पुण्याचे ‘स्वयंघोषित शिल्पकार’ यांनाच या पुराचे श्रेय दिले पाहिजे. पुणेकरांना फुकटात ‘वॉटर सफारी’ मिळाली. अजून किती विकास पुणेकरांना हवा आहे, असा उपरोधिक सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.

Web Title : पुणे बाढ़ पर ठाकरे-वडेट्टीवार ने भाजपा पर साधा निशाना।

Web Summary : पुणे में भारी बारिश के बाद ठाकरे और वडेट्टीवार ने भाजपा पर प्रशासनिक विफलता और दोषपूर्ण विकास परियोजनाओं का आरोप लगाया। उन्होंने 'स्मार्ट सिटी' पहल पर सवाल उठाया और बाढ़ के लिए अनियंत्रित निर्माण को जिम्मेदार ठहराया।

Web Title : Thackeray, Vadettiwar target BJP over Pune flood situation.

Web Summary : Thackeray and Vadettiwar criticized BJP, citing administrative failures and flawed development projects after Pune's heavy rains caused widespread damage. They questioned the 'Smart City' initiative and blamed unchecked construction for the flooding.