उसाला आला तुरा; साखर उत्पादनाचे वाजले बारा; इंदापूर तालुक्यातील चित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:55 IST2026-01-03T13:54:55+5:302026-01-03T13:55:31+5:30
- उसाचे वजन घटणार, वातावरण बदलाचा फटका

उसाला आला तुरा; साखर उत्पादनाचे वाजले बारा; इंदापूर तालुक्यातील चित्र
इंदापूर : दीर्घ काळ अतोनात पडलेला पाऊस, दिवसा मिळालेला अपुरा सूर्यप्रकाश, रात्रीचे कमी तापमान, रासायनिक खतांच्या अमाप वापराने जमिनीतील नायट्रोजन व फॉस्फरस या अन्नद्रव्यांचा झालेला ऱ्हास या सर्व बाबींमुळे तालुक्यातील सुमारे ६० टक्के पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागल्याने उसाचे वजन व साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे.
इंदापूर तालुक्यात छत्रपती सहकारी साखर कारखाना, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना, बारामती ॲग्रो युनिट आदी कारखाने आहेत. शेजारच्या बारामती, दौंड तालुके व सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा डोळा इंदापूर तालुक्यातील उसावर असतो. त्यामुळे तालुक्यात ऊस मोठ्या प्रमाणात घेतला जातो. यंदाच्या हंगामात इंदापूर तालुक्यात २९ हजार २९० हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक आहे.
उसाला तुरा येणे ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. त्यामुळे उसाचे वजन घटते. उसातील साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर पदार्थांमध्ये होते. उसाच्या वाढ्याची प्रत खालावते ते जनावरांना खाणे योग्य राहात नाही. तुरे आल्यानंतर प्रथमतः साखरेचे प्रमाण वाढते, मात्र ३-४ महिन्यांनंतर ते झपाट्याने कमी होते. रसाची शुद्धता व उसापासून बनवलेली व्यावसायिक पांढरी साखर कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनात लक्षणीय नुकसान होते.
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटने निर्माण केलेल्या जातींची लागवड आपल्याकडे होते. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने निर्माण केलेल्या ८६०३२ व को २६५ या दोन जातींची लागवड राज्यभर मोठ्या प्रमाणात होते. ८६०३२ या जातीच्या वाणात तुरे येण्याचे प्रमाण नगण्य असते. परंतु को २६५ या वाणाला यावर्षी मोठ्या प्रमाणात तुरे आल्याचे जाणवत आहे. तुरे आलेल्या उसाचे लवकरात लवकर गाळप करून घेतल्यास वजन व साखर उतारा यातील संभाव्य नुकसान टाळता येणे शक्य आहे. - राजेंद्र वाघमोडे, संचालक म. फुले कृषीविज्ञान केंद्र, इंदापूर