ऊस तुटवड्यामुळे साखर हंगाम लवकर संपतो; कार्यकाळ २००–२५० दिवसांपर्यंत वाढवण्याचा महासंघाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:57 IST2026-02-18T12:56:19+5:302026-02-18T12:57:46+5:30
- साखर हंगाम दोनशे ते अडीचशे दिवस सुरू राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.

ऊस तुटवड्यामुळे साखर हंगाम लवकर संपतो; कार्यकाळ २००–२५० दिवसांपर्यंत वाढवण्याचा महासंघाचा प्रयत्न
पुणे : काही वर्षांपूर्वी राज्याची दररोज ऊस गाळप क्षमता सुमारे साडेपाच लाख मेट्रिक टन होती. आता ती जवळपास दुप्पट झाली आहे. मात्र, क्षमतेत वाढ असूनही हंगाम लवकर संपत असल्याने साखर उद्योगासमोर आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे साखर हंगाम दोनशे ते अडीचशे दिवस सुरू राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पाटील म्हणाले, ‘पूर्वी साखर कारखाने जूनपर्यंत कार्यरत राहत; मात्र सध्या ऊस तुटवड्यामुळे केवळ ९० ते १०० दिवसांतच अनेक कारखान्यांना गाळप थांबवावे लागत आहे. वाढलेली गाळप क्षमता आणि घटलेली ऊस उपलब्धता यामधील तफावत दूर करण्यासाठी उत्पादनक्षमता वाढवणे हाच पर्याय उरला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने उसाचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. सध्या राज्यातील सुमारे ७० टक्के कारखान्यांचे गाळप पूर्ण झाले असून, बहुतांश कारखाने १५ मार्चपर्यंत बंद होण्याची शक्यता आहे.’
पुढील काही वर्षांत कारखान्यांचा कार्यकाळ २०० ते २५० दिवसांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेच्या किमतींमध्ये मंदीचे वातावरण असून, देशांतर्गत वापर सुमारे २७५ लाख मेट्रिक टनांपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे उद्योगाला इथेनॉल उत्पादनाकडे अधिक वळावे लागणार आहे. इथेनॉलचा कोटा किमान ६० कोटी लिटरने वाढवावा, अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) वेळेत मिळावा, यासाठी साखरेची किमान विक्री किंमत ४ हजार १०० रुपये करण्याची गरजही पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.