...असे नेतृत्व स्वतः मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 15:43 IST2025-04-06T15:42:18+5:302025-04-06T15:43:05+5:30
आपणच केवळ मोठे व्हावे, असे नेतृत्व स्वतः: मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही

...असे नेतृत्व स्वतः मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही : देवेंद्र फडणवीस
पुणे : कोणत्याही क्षेत्रात व्यक्ती स्वतः मोठा झाला आणि इतर कुणालाही मोठे केले नाही तर त्या व्यक्तीचा वारसा कधीच टिकत नाही. आपला वारसा टिकवायचा असेल तर तो सहकाऱ्यांच्या माध्यमातून टिकवता येतो. दुर्दैवाने, जे नेतृत्व करतात. त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्या सोबतची मंडळी मोठी झाली तर नेतृत्वही आपोआप मोठे होत असतं; पण अनेकदा नेतृत्वामध्येच असुरक्षितता असते. दुसरं कुणी मोठं होऊच नये. आपणच केवळ मोठे व्हावे, असे नेतृत्व स्वतः: मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
नामवंत वकील, अनुभव संपन्न व ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या ॲड. एस. के. जैन यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त फडणवीस यांच्या हस्ते ॲड. जैन यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, राज्यमंंत्री माधुरी मिसाळ, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पुण्याचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, ॲड. जैन यांच्या पत्नी पुष्पा जैन, खासदार मेधा कुलकर्णी तसेच ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश पांडे, गजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते.
एस. के. जैन यांनी अनेक वकिलांना घडविले. त्यांनी एक मंत्र सांगितला तो म्हणजे ‘एम्पॉवरमेंट ऑफ कलीग्स’. संघ परिवाराचा विश्वस्त कधी मालक बनत नाही. जे काम दिले आहे ते मोठे करायचे आहे. जबाबदारी संपली की दुसऱ्याला द्यायची हा भाव असायला हवा. समाजात माणूस यशस्वी होतो. तेव्हा समाजाला तो द्यायला शिकला नाही तर समाजाचे चक्र बिघडते; पण लर्न, अर्न आणि रिटर्न हे तत्त्व जैन सरांनी पाळले अशा शब्दात त्यांनी ॲड. जैन यांच्याविषयी गौरवोद्गार काढले.
सत्काराला उत्तर देताना ॲड. एस. के. जैन यांनी हा सत्कार केवळ जैन यांचा नाही तर संघाच्या मुशीत अनेक कार्यकर्ते घडले. त्या संघातील कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे. मी समाजाला काही दिले नसून, समाजाने मला भरभरून दिलं असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णकुमार गोयल यांनी प्रास्ताविक केले. गजेंद्र पवार यांनी आभार मानले.
पण ते काँग्रेसचे आणि मी...
एकदा कार्यक्रमात चंद्रकांत छाजेड म्हणाले होते की, मी मंत्री झालो ते एस. के. जैन यांच्यामुळेच. तेव्हा मी त्यांना म्हणालो की तुम्ही काँग्रेसचे आहात आणि मी संघाचा. ही आठवण ॲड. एस. के. जैन यांनी सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.
...तेव्हा अनेकांनी आम्हाला खिजवले
आमचे सरकार गेले. आमचे सरकार येईल, अशी आशा होती; पण सरकार गेले. ज्यावेळी शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होता. तेव्हा अमित शाहजींनी आम्हाला म्हणजे देवेंद्र फडणवीस व मला दोघांना जायला पाहिजे, असे सांगितले. तेव्हा शपथविधी सोहळ्यात आम्ही नि:शब्द होतो अनेकांनी आम्हाला खिजवले असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.