सोमेश्वर कारखाना व व्यावसायिक वाद टोकाला; पोलिसांच्या कडक बंदोबस्तात दुकानांपुढे पत्रे ठोकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:30 IST2025-11-11T13:30:16+5:302025-11-11T13:30:34+5:30
सोमेश्वरनगर पोलिस प्रशासन यांनी दुकानदार आणि कारखाना प्रशासन यांच्यात मध्यस्थी करत चर्चेतून सामोपचाराचा मार्ग काढूनही काही व्यापाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला आहे.

सोमेश्वर कारखाना व व्यावसायिक वाद टोकाला; पोलिसांच्या कडक बंदोबस्तात दुकानांपुढे पत्रे ठोकले
सोमेश्वरनगर: सोमेश्वर साखर कारखाना हद्दीतील व्यावसायिक आणि कारखाना प्रशासन यांच्यातील वाद चिघळला असून नवीन जागेत स्थलांतरित होण्यासाठी विरोध करणाऱ्या दुकानांपुढे आज कारखान्याने पत्रे मारले आहेत.
सोमेश्वरनगर पोलिस प्रशासन यांनी दुकानदार आणि कारखाना प्रशासन यांच्यात मध्यस्थी करत चर्चेतून सामोपचाराचा मार्ग काढूनही काही व्यापाऱ्यांनी न्यायालयीन मार्ग स्वीकारल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. परिणामी सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाने स्वतःच्या जागेत सोमवारी (दि. १०) पहाटेपासूनच दुकानांच्या कडेला पत्रे ठोकण्याची कारवाई सुरू करत संपूर्ण दुकानाला पत्रे ठोकण्यात आले आहेत. मात्र यामुळे कारखान्याला सहमती देणारे व्यावसायिक यामध्ये भरडले गेले आहेत. अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पत्रे लावण्याने एकही दुकान उघडले गेले नाही. पर्यायाने दुकानदारांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
करंजेपूल-सोमेश्वर कारखाना रस्त्यालगत असलेल्या ९२ दुकानदारांनी गेल्या पन्नास-साठ वर्षांपासून व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र, कारखान्याच्या सतत वाढणाऱ्या कामकाजामुळे ऊस वाहतुकीला आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला अडथळा निर्माण होत असल्याने रस्ता रुंद करणे अत्यावश्यक असल्याचे कारखाना प्रशासनाचे मत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कामासाठी व्यापाऱ्यांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली होती.
तसेच कारखान्याच्या वार्षिक सभेतही दुकानलाईनबाबत निर्णय घेतला होता. यापूर्वी सोमेश्वर कारखान्याचे संचालक मंडळ, पोलिस आणि पत्रकारांच्या मध्यस्थीने दोन्ही पक्षांमध्ये चर्चेद्वारे सामोपचाराचा मार्ग काढण्यात आला होता. त्यावेळी कारखान्याने व्यावसायिकांसाठी विना अनामत रक्कम आणि २० रुपये प्रति चौरस फूट भाड्याने तीन प्रकारचे गाळे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला होता. या योजनेला ९२ पैकी ७८ दुकानदारांनी संमती दर्शविली होती. मात्र, काही व्यापाऱ्यांनी नंतर सहमती पत्रात बदल करून न्यायालयीन मार्ग निवडला. त्यामुळे पुन्हा मतभेद तीव्र झाले.
सामान्य व्यावसायिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याचे कारखाना प्रशासनाने म्हटले आहे. परंतु रस्ता रुंदीकरणासाठी जागा मोकळी करणे अत्यावश्यक आहे. पत्रे ठोकल्याने नेहमी कारखाना परिसर तसेच गजबलेले चौक सुनेसुने झाले आहेत.
आमचं नुकसान नको
नवीन जागेत स्थलांतरित होण्यासाठी जवळपास ९० टक्के व्यावसायिकांनी कारखाना प्रशासनाला परवानगी दिली आहे. मात्र न्यायालयीन मार्ग स्वीकारणाऱ्या १० टक्के व्यावसायिकांमुळे इतर व्यावसायिकांच्या दुकानांपुढे देखील पत्रे ठोकले आहेत. याबाबत कारखाना प्रशासनाने विचार करावा, अशी विनंती या व्यावसायिकांनी केली आहे.
फोटो ओळ : सोमेश्वर कारखान्याने परिसरातील दुकानांसमोर पत्रे लावले.