'सोमेश्वर'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:16 IST2025-12-25T13:15:35+5:302025-12-25T13:16:13+5:30
पुण्यातील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था दरवर्षी राज्यातील उत्कृष्ट कारखान्यांचा गौरव करत असते.

'सोमेश्वर'ला सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार जाहीर
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राज्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार २९ डिसेंबर रोजी पुणे-मांजरी येथे वितरण करण्यात येणार आहे.
पुण्यातील वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट ही संस्था दरवर्षी राज्यातील उत्कृष्ट कारखान्यांचा गौरव करत असते. यावर्षीचा २०२४-२५ सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सोमेश्वर कारखान्याला जाहीर करण्यात आला आहे. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच रोख पाच लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
यापूर्वी कारखान्याने उत्कृष्ट कार्यकारी संचालक, उत्कृष्ट फायनान्स मॅनेजर, उत्कृष्ट चीफ केमिस्ट हे तीन वैयक्तिक पुरस्कार पटकावले असून उत्कृष्ट आर्थिक नियोजन, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, देशपातळीवर सर्वोत्कृष्ट कारखाना, कोजन असोसिएशनचे देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार तसेच देशपातळीवर उत्कृष्ट डिस्टलरी पुरस्कार यापूर्वी पटकावले आहेत. सन २०२३-२४ चा देश पातळीवरील नॅशनल फेडरेशनचा देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना व यावर्षीचा २०२४-२५ चा व्हीएसयायचा सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार मिळाला आहे.
सोमेश्वर साखर कारखान्याची गाळप क्षमता ७,५०० टन प्रतिदिन असून ३६ मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती व ३० किलो लिटर प्रतिदिन इथेनॉल निर्मिती प्रकल्प आहे. हंगाम २०२४-२५ मध्ये १२,२४,५२४ टन उसाचे गाळप केले असून त्यामधून १४,५६,२०५ क्विंटल साखर उत्पादन केलेले आहे. साखर कारखान्याचा साखरेचा उतारा ११.८९ टक्के इतका राहिलेला आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून ५ कोटी ८८ लाख ४५ हजार ७९८ युनिटची महावितरणला विक्री केलेली आहे. गाळप क्षमतेचा वापर १११.०३ टक्के विजेचा वापर २९.९४ किलो वॅट प्रति टन ऊसावरती राहिलेला आहे व बगॅसची बचत ७.२१ टक्के इतकी झालेली आहे. गाळपाचे बंद काळाचे प्रमाण (मेकॅनिकल ॲन्ड इलेक्ट्रिकल) ०.०६ टक्के इतके असून मागील वर्षीच्या तुलनेत गाळप क्षमतेत वाढ ५.०३ टक्के इतकी झालेली आहे.