तीस लाखांची लाच घेताना सोसायटी लिक्विडेटरसह तत्कालीन ऑडिटरला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 19:30 IST2025-12-06T19:30:02+5:302025-12-06T19:30:51+5:30
- तक्रारदार व नवीन सभासदांनी २०२३ मध्ये तत्कालीन प्रशासक ऑडिटर भास्कर पोळ यांच्या नावे अर्ज करून त्यामध्ये शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता

तीस लाखांची लाच घेताना सोसायटी लिक्विडेटरसह तत्कालीन ऑडिटरला अटक
पुणे : धनकवडी येथील एकता सोसायटीच्या लिक्विडेटर आणि ऑडिटरने तब्बल ८ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या ८ कोटींपैकी ३० लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना सापळा रचून दोघांना अटक केली. ५ डिसेंबर रोजीच्या तक्रारीवर त्याच दिवशी पडताळणी झाल्यावर प्रत्यक्ष लाच घेताना दोघांना पकडण्यात आले. लिक्विडेटर विनोद माणिकराव देशमुख (५०, रा. सिंहगड दर्शन सोसायटी, वडगाव खुर्द, धायरी फाटा) आणि ऑडिटर आणि तत्कालीन प्रशासक भास्कर राजाराम पोळ (५६, रा. सुश्रुत रेसिडेन्सी, गजानन महाराज मंदिराजवळ, नऱ्हे गाव), अशी अटकेतील संशयितांची नावे असून, ही कारवाई तक्रारदारांच्या शनिवार पेठ कार्यालयासमोर ५ डिसेंबरला सायंकाळी सात वाजता करण्यात आली.
तक्रारदार हे धनकवडी येथील एकता सहकारी सोसायटीचे नवीन सभासद आहेत. तक्रारदारांसह इतर ३२ नवीन सभासद आहेत की, ज्यांनी २००५ मध्ये जुन्या सभासंदाकडून एकता सहकारी सोसायटीचे शेअर विकत घेऊन नवीन सभासदस्यत्व घेतले होते. पंरतु, २०२० मध्ये मूळ सभासद आणि नवीन सभासद यांच्यामध्ये सभासदस्यत्वावरून वाद होऊन तो सहकार विभागाकडे गेला. सहकार विभागाने या सोसायटीवर प्रशासक नेमले. प्रशासकाने मूळ सभासद व नवीन सभासद यांच्याकडे चौकशी करून सहकार विभागाकडे अहवाल सादर केला. त्यानुसार सोसायटी लिक्विडेशनमध्ये निघाली. या सोसायटीवर २०२४ मध्ये विनोद देशमुख याची लिक्विडेटर म्हणून नेमणूक झाली.
तक्रारदार व नवीन सभासदांनी २०२३ मध्ये तत्कालीन प्रशासक ऑडिटर भास्कर पोळ यांच्या नावे अर्ज करून त्यामध्ये शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. पोळ याने कार्यवाही करुन तक्रारदार वगळता इतर ३२ नवीन सभासदांचे अर्ज निकाली काढले. परंतु, तक्रारदार सुनावणीसाठी उपलब्ध नसल्याने त्यांचा विनंती अर्ज प्रलंबित ठेवला. सप्टेंबर २०२५ मध्ये तक्रारदार त्यांच्या विनंती अजार्बाबत ऑडिटर व तात्कालीन प्रशासक भास्कर पोळ यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी पोळ याने तक्रारदार व इतर ३२ सभासदांना शेअर सर्टिफिकेटसाठी, स्वत:सह सध्याचे लिक्विडेटर विनोद देशमुख याच्यासाठी ३ कोटी रुपयांची लाच मागितली. भविष्यातील लिलाव प्रक्रियेमध्ये या सोसायटीची जागा तक्रारदार सांगतिल त्याला देण्यासाठी ५ कोटी रुपये, असे एकूण ८ कोटी रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ५ डिसेंबर रोजी तक्रार आल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी विनोद देशमुख आणि भास्कर पोळ यानी तक्रारदाराचे ८ कोटींपैकी ३० लाख रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.