पुण्यातून तब्बल इतक्या नागरिकांनी केला प्रवास; अशी आहे आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:34 IST2026-01-07T15:33:43+5:302026-01-07T15:34:58+5:30
- प्रवासी वाहतुकीतून पुणे विभागाला १५७६ कोटींवर महसूल

पुण्यातून तब्बल इतक्या नागरिकांनी केला प्रवास; अशी आहे आकडेवारी
पुणे :पुणे रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ मध्ये पुणे रेल्वे विभागातून साडेसहा कोटी प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला असून, ही संख्या २०२४ च्या तुलनेत तब्बल ९.३ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असून, एका वर्षात तिकीट विक्रीतून रेल्वेला १ हजार ५७६ कोटी रुपयांचे महसूल मिळाले आहे.
मध्य रेल्वे विभागातील पुणे रेल्वे विभाग हा महत्वाचा विभागत आहे. पुणे रेल्वे स्थानकातून दररोज सरासरी २१० गाड्यांची ये-जा होते. तर पुणे रेल्वे स्थानकावरून सुमारे ७८ गाड्या दररोज सुटतात. यामध्ये उत्तर भारतात जाणाऱ्या झेलम एक्स्प्रेस, आझाद हिंद एक्स्प्रेस, दानापूर एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना वर्षभर मोठी गर्दी असते. त्याचबरोबर पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासकामांमुळे आणि सुविधांमध्ये झालेल्या सुधारणांमुळे उपनगरांसह पुणे विभागातील इतर स्थानकांवरूनही प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शिवाय स्वस्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवास असल्याने नागरिकांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवासी संख्या वाढली आहे.
६० लाख प्रवासी वाढले :
पुणे रेल्वे विभागातून २०२४ मध्ये ५ कोटी ९० लाख ५८ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यावेळी रेल्वेला १ हजार ३८६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. २०२५ मध्ये सुमारे ६० लाख प्रवासी वाढली असून, एकूण प्रवासी संख्या साडेसहा कोटींवर पोहोचली आहे. लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. शिवाय पुण्यातून काही मार्गावर नव्याने गाड्या सुरू करण्यात आले आहे. त्याचा फायदा रेल्वे आणि प्रवाशांना होत आहे.
विशेष गाड्यांचा परिणाम :
पुणे विभागातून उन्हाळी सुट्टी, छटपूजा आणि दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात येत आहे. यामुळे प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. दिवाळीतच सुमारे एक हजार विशेष गाड्या सोडण्यात आले होते. हडपसर आणि खडकी येथे उभारण्यात येत असलेली नवीन टर्मिनल अंतिम टप्प्यात असून, येथून विशेष तसेच काही नियमित गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. ही दोन्ही टर्मिनल नवीन वर्षात पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर गाड्यांची संख्या आणखी वाढणार असून, त्याचा फायदा प्रवाशांसह रेल्वे प्रशासनालाही होणार आहे.
अशी आहे आकडेवारी :
पुण्यातून धावणाऱ्या एकूण रेल्वे गाड्या : २८९
पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या : ७८
२०२५ मध्ये पुणे विभागातील प्रवासी : ६ कोटी ५० लाख
२०२५ मधील तिकीट महसूल : १५७६ कोटी रुपये
२०२५ मध्ये वाढलेली प्रवासी संख्या : ६० लाख
२०२४ मधील एकूण प्रवासी संख्या : ५ कोटी ९० लाख
२०२४ मधील तिकीट महसूल : १३८६ कोटी
पुण्यातून यंदा हंगामी, विशेष रेल्वे गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोयी झाली. तसेच रेल्वेच्या महसुलात वाढ झाली आहे. -हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे