शीतल तेजवानीला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; तीन तासांहून अधिक वेळ सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:44 IST2025-12-05T12:38:09+5:302025-12-05T12:44:54+5:30
खरेदीखतात तेजवानी व ‘अमेडिया’ यांनी मालक असा केलेला उल्लेख दिशाभूल करणारा आहे. त्यांना ही मिळकत विक्रीचा कुठलाही अधिकार नव्हता. सध्या ही मिळकत बॉटनिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवाटीत आहे.

शीतल तेजवानीला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी; तीन तासांहून अधिक वेळ सुनावणी
पुणे : आरोपी शीतल तेजवानी हिने ११ हजार रुपयांचा डीडी कोणत्या आधारे भरला, जमिनीच्या किमतीचा खरेदीखतामध्ये उल्लेख का केला नाही? रक्कम रोख व इतर मार्गाने घेतली किंवा कशी घेतली? या गुन्ह्याचा कट करण्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत? मूळ वतनदार यांच्याकडून घेतलेले मूळ पॉवर ऑफ अॅटर्नी, मूळ विकसन करारनामे व इतर वेगवेगळे दस्त तिच्याकडून हस्तगत करायचे आहेत. जमिनीचे पैसे कोणत्या मार्गाने व कोणत्या खात्यामध्ये कसे घेतले आहेत याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील अमित यादव यांनी आरोपी शीतल तेजवानी हिला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी यांच्या वतीने जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, खरेदीखतात तेजवानी व ‘अमेडिया’ यांनी मालक असा केलेला उल्लेख दिशाभूल करणारा आहे. त्यांना ही मिळकत विक्रीचा कुठलाही अधिकार नव्हता. सध्या ही मिळकत बॉटनिक सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताबे वहिवाटीत आहे. ही मिळकत कधीही आरोपीच्या ताब्यात नव्हती. मिळकत १२०० कोटींपेक्षा जास्त किमतीची असताना ३०० कोटींस दाखविण्याचा त्यांचा उद्देश काय होता?, बेकायदा खरेदीखत अस्तित्वात आणण्यामागे त्यांचा काय होत होता? याचा सखोल तपास करण्यासाठी त्यांना पोलिस कोठडी द्यावी. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बागल यांनी तिला ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
तेजवानी हिच्यावर दाखल आहेत नऊ गुन्हे
तेजवानीच्या विरोधात पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील नऊ पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहे. यामध्ये, पिंपरी पोलिस ठाण्यात पाच, हिंजवडी, शिवाजीनगर आणि बावधन पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. याखेरीज, आर्थिक गुन्हे शाखेतही एक गुन्हा दाखल आहे. सर्व गुन्हे हे फसवणुकीसंदर्भात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
तेजवानीला न्यायालयात आली चक्कर
न्यायालयात सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू असतानाच शीतल तेजवानीला चक्कर आल्याचा दावा तिने केला. त्यानंतर न्यायाधीशांनी तिला समोरील खुर्चीवर बसण्यास परवानगी दिली.
अटकेची आवश्यकता नव्हती
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासासाठी बोलावले तेव्हा त्या सातत्याने हजर राहिल्या. आत्तापर्यंत तीनहून अधिक वेळा त्यांची चौकशी झाली आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये तेजवानी यांच्याविषयीचा उल्लेखच नाही आहे. त्याची या गुन्ह्यात काहीच भूमिका नाही. पोलिसांनी त्यांना अटक करताना नियमावली पाळलेली नाही, असा युक्तिवाद तेजवानी यांचे वकील अजय भिसे यांनी केला. महार वतनदारांच्या वतीने ॲड. अरुण सोनावणे यांनी बाजू मांडली.
तीन तासांहून अधिक वेळ सुनावणी
तेजवानीच्या प्रकरणावर गुरुवारी न्यायालयात तब्बल तीन तासांहून अधिक वेळ युक्तिवाद चालला. तिला गुरुवारी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले होते. सव्वातीन वाजता सुनावणी सुरू झाली. सुरुवातीला तिच्या बेकायदेशीर अटकेवर दोन तास युक्तिवाद झाला. त्यानंतर तिच्या रिमांड रिपोर्टवर सुनावणी सुरू झाली. संध्याकाळी साडेसहापर्यंत याबाबत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद सुरू होता. त्यानंतर रात्री सव्वाआठच्या सुमारास न्यायालयाने पोलिस कोठडीचा आदेश दिला. तेजवानीला हजर केल्यानंतर न्यायालयात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.