शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:54 IST2025-04-16T15:52:38+5:302025-04-16T15:54:25+5:30
माझी शरद पवारांना विनंती आहे, त्यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वत:च इतिहास लिहावा,

शरद पवारांनी इतिहास लिहून हवी त्यांची माती करावी; गोपीचंद पडळकरांची टीका
पुणे : संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघ केवळ ब्राह्मण द्वेषापोटी नवनवीन वाद उकरून काढतात. अडीचशे रुपयाचे जाकीट घालून नवनवीन इतिहास अभ्यासक येतात आणि शरद पवारांना फॉर अशी भुमिका मांडतात. माझी शरद पवारांना विनंती आहे, त्यांनी इतर इतिहास अभ्यासक पुढे करण्यापेक्षा स्वत:च इतिहास लिहावा, आणि त्यांना ज्या जातीची, समाजाची माती करायची आहे ती करावी, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघात बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ. पडळकर बोलत होते. रागयगडावरील वाघ्या श्वानाच्या वादावर बोलताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे होळकरांच्या पुढाकाराने रायगडावर उभारलेल्या वाघ्या श्वानाच्या प्रति धनगर समाजाची आस्था आहे. संभाजी ब्रिगेड आणि मराठा महासंघाचे लोक ब्राह्मण समाजाला लक्ष करण्यासाठी जाणून बुजून वाद उकरून काढतात. जात पाहून इतिहास काढण्याची पद्धत २०१४ पासून सुरू झाली आहे.
शरद पवार यांना फॉर भुमीका अडीचशे रुपयाचे जाकीट घालणारे इतिहास अभ्यासक घेतात. शरद पवारांचा संपूर्ण पक्ष अजित पवारांकडे आला आहे. त्यामुळे शरद पवारांकडे मोकळा वेळ आहे. या वेळात शरद पवार यांनी स्वत: इतिहास लिहावा, आणि त्याना ज्या समाजाचे व जातीचे वाटोळे करायचे आहे ते करावे, त्यांनी इतर अभ्यासकांना कामाला लावू नये. वाघ्याचा पुतळा हटवा म्हणणारे संभाजी ब्रिगेड संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या कबरीवर काहीच बोलत नाही, असेही आ. पडळकर म्हणाले.
खासदार छत्रपती उदयनराजे यांनीही वाघ्याच्या स्मारकास विरोध केला आहे. तेही शरद पवारांना फॉर भुमीका घेत आहेत का, या प्रश्नावर मात्र पडळकर यांनी सावध भुमीका मांडली. ते म्हणाले, उदयनराजे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. याबाबत सामंजस्याने भुमीका घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठरले आहे. सरकारने वाघ्याच्या स्मारकाची सुरक्षा वाढवावी आणि इतिहास अभ्यास संजय सोनावणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, अशी मागमीही आ. पडळकर यांनी केली.
स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात नवीन पुढारी तयार झाले...
मी एमपीएससी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडलेला नाही. या विद्यार्थ्यांमध्ये नवीन पुढारी तयार झाले आहेत. ते माझ्याकडे आले तर मी त्यांना घेवून मुख्यमंत्र्यांकडे जाईन, आणि त्यांचा प्रश्न सोडवीन. मात्र, नवीन पुढारी क्लासेस चालवणाऱ्याच्या इशाऱ्यावर काम करतात. त्यामुळे सरकारने यासंदर्भात एक धोरण करावे, असेही आ. पडळकर म्हणाले.