यवतच्या मानकोबावाडा परिसरात तीव्र पाणीटंचाई; दरवर्षीच्या टँकर खर्चाऐवजी होऊ शकतो कायमचा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 15:55 IST2025-04-13T15:54:41+5:302025-04-13T15:55:54+5:30
यवतच्या मानकोबावाडा परिसरात तीव्र पाणीटंचाई; दरवर्षीच्या टँकर खर्चाऐवजी होऊ शकतो कायमचा उपाय

यवतच्या मानकोबावाडा परिसरात तीव्र पाणीटंचाई; दरवर्षीच्या टँकर खर्चाऐवजी होऊ शकतो कायमचा उपाय
यवत : येथील मानकोबावाडा परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील पाण्याने तळ गाठल्याने टँकर चालू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. उन्हाळा आला की यवतमधील महामार्गाच्या दक्षिण बाजूला भुलेश्वर डोंगर पायथ्याला असलेल्या वस्त्यांमध्ये तीव्र पाण्याची टंचाई निर्माण होते. या भागातील वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी प्रशासनाला टँकर चालू करावे लागतात.
या भागात मानकोबावाडा, खुपटे वस्ती, लाटकर वस्ती, वाघदर वस्ती, दोरगे वस्ती, मलभारे आदी भागात मोठी लोकसंख्या आहे. मात्र, उन्हाळा आला की या भागात पाणीटंचाई ठरलेली आहे. काही अंतरावरून नवीन मुठा उजवा कालवा गेलेला असताना, टँकर सुरू करणे म्हणजे केवळ नियोजनाचा अभाव असल्याचे यावरून दिसून येते. मात्र आता हा पाणीप्रश्न कायमचा सोडवा अशी तळमळीची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
यवत ग्रामपंचायतीने पाणीटंचाई निर्माण झालेल्या भागात टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला आहे. याबाबत प्रशासकीय कारवाई होऊन टँकर सुरू होईल असे सांगितले जात आहे. मात्र यातील मानकोबावाडा भागातील पाणीटंचाईवर थोडक्या खर्चात कायमचा मार्ग निघू शकतो. यासाठी ग्रामपंचायतीने मुंजोबाच्या तलावात नवीन मुठा कालव्यातील पाणी पाइपलाइन करून सोडल्यास, बाजूच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणी नागरिकांना देता येऊ शकते.
यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच समीर दोरगे, ग्रामविकास अधिकारी बालाजी सरवदे यांनी ही बाब तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या निदर्शनास आणून टंचाई निधीमधून ही पाइपलाइन करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी केली आहे. या कामासाठी लागणारे अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीला दिल्या आहेत. ग्रामपंचायतीने सदर अंदाजपत्रक दिले असून यावर प्रशासनाने गांभिर्याने हालचाल केल्यास आणि प्रशासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास मानकोबावाडा परिसरात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मार्ग निघू शकतो.
पाणीटंचाईच्या काळात पर्यायी उपाययोजना शासनाकडून केल्या जातात. त्या अनुषंगाने यवत आणि भांडगाव गावांच्या सीमेवरील मुंजोबाच्या तलावात पाणी सोडण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून संबंधित विभाग यावरील प्रस्तावावर कार्यवाही करतील. - अरुण शेलार, तहसीलदार दौंड
यवत आणि भांडगाव गावांच्या सीमेवरील तलावात टंचाईच्या काळात पाणी सोडण्यात यावे. यासाठी लागणाऱ्या योजनेचा प्रस्ताव यवत ग्रामपंचायतीने आमच्याकडे दिला आहे. सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रशासनाने याला मान्यता दिल्यास लवकरच ही योजना राबविली जाईल.
- प्रशांत काळे, गटविकास अधिकारी