पुणे शहरातील सर्वात गजबजलेल्या स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 11:12 IST2025-11-16T11:10:05+5:302025-11-16T11:12:39+5:30
- मेट्रो स्टेशनसमोरील परिसरात बेकायदा स्टॉल्स उभारले गेले असून, त्याठिकाणी गॅसचा वापर सर्रासपणे केला जातो.

पुणे शहरातील सर्वात गजबजलेल्या स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर
सहकारनगर : दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरालाही विशेष सतर्कतेचा आदेश दिला असला तरी स्वारगेट मेट्रो स्टेशन परिसरातील सुरक्षाव्यवस्था मात्र रामभरोसे असल्याचे चित्र दिसत आहे.
पुण्यातील सर्वाधिक गजबजलेल्या आणि महत्त्वाचे ठिकाण असलेले स्वारगेट मेट्रो स्टेशन हे हजारो प्रवाशांची दररोजची वाहतूक पाहते. या परिसरात बसस्थानक, बाजारपेठ तसेच मोठ्चा प्रमाणावर पादचारी आणि वाहनांची वर्दळ असते. मात्र, इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे. पुणे शहरात महानगरपालिकेने आणि पोलिस प्रशासनाने प्रत्येक प्रभागात सीसीटीव्ही बसविले असतानाही स्वारगेटसारख्या महत्त्वाच्या ठिकाणचा विसर पडल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. या ठिकाणी चोरीच्या घटना वारंवार घडत असून, पोलिस ठाण्याशी सीसीटीव्ही प्रणाली जोडलेली नाही.
कॅमेऱ्यांचे ऑडिट करा
पुणे शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे. विशेषतः अशा गजबजलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग तपासणी केंद्रे, चेकिंग पॉइंट वाढविणे अत्यावश्यक बनलेले आहे.
मेट्रो स्टेशन बाहेर नेहरू स्टेडियम चौकीशेजारून काही महिन्यांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला गेली. ही जर अवस्था पोलिसाची असेल तर सामान्य जनतेचे काय? - अमोल शुक्ल, मेट्रो प्रवासी
आतापर्यंत पुणे मेट्रो यांना स्वारगेट पोलिस ठाण्याकडून सीसीटीव्हीबाबत दोन पत्रे देण्यात आली आहेत, मात्र याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करत आहोत. - यशवंत निकम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट