भाविक मूर्ती घेऊन जातो,तेव्हा डोळ्यात पाणी येतं;मूर्तिकारांचे प्रत्येक गणेश मूर्तीशी असते भावनिक नाते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:58 IST2025-08-26T09:54:11+5:302025-08-26T09:58:06+5:30

गणेशोत्सवात दहा दिवसांचा पाहुणा बनून आलेला गणपती बाप्पा केवळ मूर्तिकारांनाच नव्हे, तर आबालवृद्धांनाही जीव लावून जातो

pune news sculptors have an emotional connection with every Ganesha idol | भाविक मूर्ती घेऊन जातो,तेव्हा डोळ्यात पाणी येतं;मूर्तिकारांचे प्रत्येक गणेश मूर्तीशी असते भावनिक नाते

भाविक मूर्ती घेऊन जातो,तेव्हा डोळ्यात पाणी येतं;मूर्तिकारांचे प्रत्येक गणेश मूर्तीशी असते भावनिक नाते

पुणे : गणेशोत्सवाला आता एक दिवसच उरला आहे. शहरभर उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण आहे, पण या उत्सवाच्या मागे उभा असतो एक असा वर्ग, जो आपल्या हृदयात भावनांचा कल्लोळ घेऊन हा सण साजरा करतो-तो म्हणजे मूर्तिकार.

गणेशोत्सवात दहा दिवसांचा पाहुणा बनून आलेला गणपती बाप्पा केवळ मूर्तिकारांनाच नव्हे, तर आबालवृद्धांनाही जीव लावून जातो. सध्या गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साकारलेली मूर्ती भक्तांच्या हातात सोपविताना मूर्तिकारांचे अंतःकरण जड झाले आहे. प्रत्येक मूर्ती साकारताना त्यांनी केवळ हातांनी नव्हे, तर हृदयानेही ती मूर्ती घडवलेली असते.

जणू काही आपल्या लेकराला प्रेमाने घडवत आहोत, अशा आपुलकीने, काळजीने आणि भक्तीने ती मूर्ती तयार केली जाते, पण जेव्हा ही मूर्ती घरी नेण्यासाठी भाविक येतो, तेव्हा त्या मूर्तिकाराच्या डोळ्यात चमकणारा आनंद आणि हळव्या मनात दाटून आलेलं दुःख एकाचवेळी जाणवतं.

मूर्तिकार गणेश लांजेकर सांगतात की, आम्ही शेकडो मूर्ती बनवतो, पण प्रत्येक मूर्तीशी एक वेगळं नातं तयार होतं. जणू आपल्या घरातलाच तो एक सदस्य असतो. शेवटची मूर्ती निघून जाते तेव्हा कारखाना भकास वाटतो... याच भावना राहुल वाघमारे या मूर्तिकाराच्या शब्दांतही उमटतात. आम्ही मूर्ती घडवतो तेव्हा ती फक्त मातीची नसते. त्या मातीमध्ये आमचं प्रेम, श्रम आणि श्रद्धा मिसळलेली असते. जेव्हा भाविक ती मूर्ती घेऊन जातो, तेव्हा डोळ्यात पाणी येतं. जणू आपल्या हाताने घडवलेलं लेकरू दुसऱ्याच्या घरी गेलंय. हे शब्द ऐकताना लक्षात येतं की, गणेशोत्सव हा केवळ आरती, फुलं आणि प्रसादाचा सण नाही. तो मूर्तिकारांच्या मनाच्या खोलवर रुजलेल्या भावनांचा उत्सव आहे.

Web Title: pune news sculptors have an emotional connection with every Ganesha idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.