सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘रिव्हर्स गिअर’वर; अशी हाेतेय घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 14:08 IST2025-11-11T14:07:31+5:302025-11-11T14:08:03+5:30

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठाचीच ही अवस्था झाल्याने इतर सार्वजनिक विद्यापीठाच्या गुणवत्तेचा विचार न केलेलाच बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. प्रत्येक पुणेकर अन् मराठी माणसालाच मान खाली घालायला लावणारी ही वाटचाल आहे.

pune news savitribai Phule Pune University on reverse gear | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘रिव्हर्स गिअर’वर; अशी हाेतेय घसरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘रिव्हर्स गिअर’वर; अशी हाेतेय घसरण

पुणे : जगभर ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट अशी ख्याती मिळवलेले आणि ७६ वर्षांची गाैरवशाली परंपरा लाभलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मागील काही वर्षांत ‘रिव्हर्स गिअर’वर आले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे विद्यापीठाचीच ही अवस्था झाल्याने इतर सार्वजनिक विद्यापीठाच्या गुणवत्तेचा विचार न केलेलाच बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

प्रत्येक पुणेकर अन् मराठी माणसालाच मान खाली घालायला लावणारी ही वाटचाल आहे. या अपयशाला विद्यापीठ प्रशासनाबराेबरच राज्य आणि केंद्र सरकारही कारणीभूत आहे. प्रथमत: ही विदारकता स्वीकारू, त्याच्या कारणांचा अभ्यास करू आणि सार्वजनिक तथा राज्य विद्यापीठाचा दर्जा सुधारण्यासाठी पुढाकार घेऊ, असा संकल्प करण्याची वेळ आता आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना ‘पुणे विद्यापीठ कायदा १९४८’ अंतर्गत १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. पहिले कुलगुरू म्हणून डॉ. एम. आर. जयकर यांनी पदभार स्वीकारला हाेता. सन १९४८ ते २०२५ दरम्यान बॅरिस्टर जयकर ते डाॅ. सुरेश गाेसावी असे २२ कुलगुरू विद्यापीठाला लाभले आहेत.

मागील काही वर्षांचा आढावा घेता नॅकमध्ये ‘अ’ दर्जा टिकून असल्याचे दिसते, पण राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रमवारीत घसरण झाली आहे. मागील वर्षभरात विद्यापीठाने अनेक सामंजस्य करार केले. अनेक चांगल्या संस्था विद्यापीठाशी जोडल्या गेल्या. आयुष मंत्रालयाच्या ‘अश्वगंधा’ या औषधी वनस्पतीवरील संशोधनात विद्यापीठ सहभागी झाले. राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयासोबत विद्यापीठाने ‘लोकशाही गप्पा’ हा कार्यक्रमही घेतला. ई-शैक्षणिक साहित्य निर्माण होण्याच्या दृष्टीने प्राध्यापकांना ‘इनोव्हेटिव्ह ई कंटेंट पुरस्कार’ही दिला. इतिहास, मानवशास्त्र आणि व्यंगचित्रकला संग्रहालय सुरू केले. ‘हेरिटज वॉक’ हा उपक्रमही हाती घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारत त्याला कुस्तीवीर खाशाबा जाधव यांचे नाव दिले. नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करत नवोन्मेषित उद्योगांना जोडून घेत व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम देखील सुरू केले आहेत. अडीचशेहून अधिक महाविद्यालयात ‘स्टार्टअप इनोव्हेशन सेल’ची स्थापना केली. पण, विद्यार्थी व शिक्षक यांच्या संख्येतील तफावत, प्रशासनाची उदासीनता आणि अज्ञान, दर्जाहीन संशोधन पेपर (एनआयआरएफ क्रमवारी दरम्यान ५०० पैकी ४९५ संशोधन पेपर बाद ठरवले गेले.), टीचिंग-लर्निंग, संशोधन, पब्लिकेशन, प्लेसमेंट, पर्सेप्शन यात अपेक्षित याेगदान देऊ न शकल्याने विद्यापीठाची घसरण झाल्याचे दिसते.

विशेषत : धाेरण ठरविण्यात आणि भरती प्रक्रियेत मागील दहा-बारा वर्षांत वाढलेला राजकीय पक्ष-संघटनांचा हस्तक्षेप ही माेठी डाेकेदु:खी ठरल्याचे निरीक्षण तज्ज्ञ मंडळींसह विद्यार्थी प्रतिनिधी नाेंदवत आहेत. काही प्रशासकांनी राजकीय इच्छाशक्ती बाळगून सर्वांना फाट्यावर मानत मनमानी निर्णय घेतले; तर काहींनी कुणालाच नाराज करायचे नाही म्हणून निर्णयच घेतले नाही. असेही निरीक्षण नाेंदवले जात आहे.

अशी हाेतेय घसरण :

- ‘क्यूएस’ या जागतिक पातळीवरील क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पन्नास क्रमांकाने वरच्या गटात मार्गक्रमण करत ‘५०० ते ५५०’ च्या गटक्रमवारीत स्थान मिळविले. सन २०२३ मध्ये ८०० ते १००० या स्थानातून ६०१ ते ८०० टप्प्यात मजल मारली हाेती.

- क्यूएस जागतिक मानांकनात २०२६ या वर्षात ५६६ व्या स्थानी आहे. आशिया रँकिंगमध्ये २०२५ मध्ये विद्यापीठाची क्रमवारी १७३ व्या स्थानावर होती, ती २०२६ मध्ये २०७ व्या स्थानी आली आहे.

- राष्ट्रीय मानांकन (एनआयआरएफ) २०२५ मध्ये घसरले असून, विद्यापीठाचे स्थान एकूण श्रेणीमध्ये ९१ व्या स्थानी आहे. हेच सात वर्षांपूर्वी अर्थात २०१८ मध्ये १६ व्या स्थानी हाेते. सन २०२३ मध्ये एकूण श्रेणीत ३५ वा आणि विद्यापीठांच्या श्रेणीत १९ वा क्रमांक हाेता. राजकीय हस्तक्षेप आणि विद्यापीठातील इतर समस्यांमुळे ही घसरण झाल्याचे बाेलले जात आहे.

-------

दृष्टिक्षेपात...

- कॅम्पसचे एकूण क्षेत्रफळ : ४११ एकर

- अधिकार क्षेत्र : पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक.

- शैक्षणिक विभागांची संख्या : ४६

- संलग्न महाविद्यालयांची संख्या : ७०५

- मान्यताप्राप्त संस्था : २३४

- संशोधन संस्था : ७१

- विद्यापीठ विभागांमधील शिक्षक : २९३

- अध्यासने : २०

- विद्याशाखा : ०४

- पहिले कुलगुरू : डॉ. एम. आर. जयकर

- विद्यमान कुलगुरू : प्रा. (डॉ.) सुरेश गोसावी

Web Title : पुणे विश्वविद्यालय का पतन: कभी 'पूरब का ऑक्सफोर्ड', अब संघर्षरत।

Web Summary : सावित्रीबाई फुले पुणे विश्वविद्यालय, गिरती रैंकिंग और प्रशासनिक मुद्दों का सामना करते हुए, गुणवत्ता संबंधी चिंताओं को देख रहा है। राजनीतिक हस्तक्षेप, खराब अनुसंधान और शिक्षक-छात्र अनुपात प्रतिष्ठा को प्रभावित करते हैं। तत्काल कार्रवाई की आवश्यकता है।

Web Title : Pune University's decline: Once 'Oxford of the East', now struggling.

Web Summary : Savitribai Phule Pune University, facing declining rankings and administrative issues, sees quality concerns. Political interference, poor research, and teacher-student ratio impact prestige. Urgent action needed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.