मळणी मशीनमध्ये साडीचा स्कार्फ अडकला; वनपुरीतील शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:33 IST2026-03-20T11:32:47+5:302026-03-20T11:33:05+5:30
- ज्वारी मळणीदरम्यान भीषण अपघात; त्याच दिवशी दुसऱ्या महिलेला थोडक्यात बचाव, मुलानेच रुग्णवाहिका चालवत मदतीला धाव

मळणी मशीनमध्ये साडीचा स्कार्फ अडकला; वनपुरीतील शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू
सासवड : शेतातील ज्वारी काढून झाल्यानंतर मळणी करत असताना मशीनमध्ये डोके अडकून वनपुरी (ता. पुरंदर) येथील शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मंगल तुकाराम कुंभारकर (वय ५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत दत्तात्रय रोहीदास यादव (रा. माळशिरस, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगल कुंभारकर या त्यांचा मुलगा विकास कुंभारकर यांच्यासह माळशिरस येथील पाटीलवस्ती परिसरातील शेतात ज्वारीची कणसे मळणी मशीनमध्ये टाकण्याचे काम करीत होत्या. त्यावेळी त्यांनी डोक्याला बांधलेला स्कार्फ मशीनच्या चक्रात अडकला आणि क्षणात त्या मशीनकडे ओढल्या गेल्या.
मशीनजवळ उभे असलेले मशीन मालक नामदेव भानुदास बनकर (रा. राजुरी, ता. पुरंदर) यांनी तत्काळ मशीन बंद करण्याचा प्रयत्न केला; मात्र काही क्षणांतच हा भीषण अपघात घडला आणि त्यात मंगल कुंभारकर यांचा जागीच मृत्यू झाला.
त्याच दिवशी दुसऱ्या महिलेचा थोडक्यात बचाव
घटनेच्या दिवशी वनपुरी येथेच अशीच आणखी एक दुर्घटना घडली. धान्य मळणी मशीनमध्ये स्कार्फ अडकल्याने चंद्रभागा मारुती कुंभारकर या जखमी झाल्या. त्यांनी वेळीच स्कार्फ सोडविल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र त्यांच्या डोक्याचे केस उपटले गेले आणि त्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आई जखमी असतानाही मुलगा मदतीला धावला
माळशिरस परिसरात तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने वनपुरी ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णवाहिकेचा चालक दत्तात्रय कुंभारकर हा जखमी झालेल्या चंद्रभागा कुंभारकर यांचा मुलगा आहे. स्वतःच्या आईवर उपचार सुरू असतानाही सामाजिक जबाबदारी ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णवाहिका घेऊन माळशिरस येथे धाव घेतली. तेथून मंगल कुंभारकर यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जेजुरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.