रिंगरोडचे काम २० टक्के पूर्ण, येत्या दोन वर्षांत पश्चिम टप्प्याचे काम पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 19:09 IST2026-01-02T19:09:29+5:302026-01-02T19:09:59+5:30
- पूर्व टप्पा पूर्ण होण्यात अडीच वर्षे लागणार

रिंगरोडचे काम २० टक्के पूर्ण, येत्या दोन वर्षांत पश्चिम टप्प्याचे काम पूर्ण होणार
पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या बाह्य रिंगरोडचे २० टक्के काम पूर्ण झाले आहे. मुख्यत्वे पश्चिम टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली. तर, पूर्व टप्प्याचे कामही सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान रिंगरोडच्या ३१ किलोमीटरच्या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आल्या आहेत. लवकरच त्याचे कामही देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. महामंडळाकडून हे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत केले जात असून, पश्चिम टप्प्याचे काम सुमारे २० टक्क्यांपर्यंत झाले आहे. पावसाळा संपल्यामुळे या कामाला आता वेग आला असून, मेअखेर महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पश्चिम टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची अर्थात डिसेंबर २०२७ अखेर अशी मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती वसईकर यांनी दिली. तर, पूर्व टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे २०२८ची मदत देण्यात आली आहे. त्या वेळी संपूर्ण रिंगरोड पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पूर्वेकडील टप्प्यात एनएचआयने पुणे संभाजीनगर दरम्यान ग्रीन कॅरिडोरचे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे नगर रस्त्यापासून सोलापूर रस्त्याला आणि पुढे पुणे- बंगळूर रस्त्याला जोडणाऱ्या रिंगरोडचे ३१ किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. परंतु, मध्यंतरी प्राधिकरणाने निर्णयात पुन्हा बदल करत हे काम महामंडळानेच करावे, असे सुचविले.