दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ हजार २३४ दस्तांची नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 14:37 IST2025-10-04T14:31:43+5:302025-10-04T14:37:02+5:30
पुणेकरांनी विजयादशमीचा मुहूर्त साधत नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या १० दिवसांमध्ये एकूण ११ हजार २३४ सदनिकांसह मालमत्तेची खरेदी करत विजयादशमीचा आनंद लुटला

दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ हजार २३४ दस्तांची नोंदणी
पुणे : दस्त नोंदणीसाठी नवरात्र आणि दसरा सकारात्मक ठरला आहे. या १० दिवसांच्या काळात ११ हजार २३४ दस्तांची नोंदणी झाली आहे. यातून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ४०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या दस्तांमध्ये प्लॉट व फ्लॅटचा समावेश आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला ही नोंदणी दिवाळीसाठी पूरक ठरणार आहे.
पुणेकरांनी विजयादशमीचा मुहूर्त साधत नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या १० दिवसांमध्ये एकूण ११ हजार २३४ सदनिकांसह मालमत्तेची खरेदी करत विजयादशमीचा आनंद लुटला. यामधून मुद्रांक शुल्क आणि नोंदणी विभागाला ४०७ कोटी १२ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणेकर दरवर्षी या काळात मोठ्या प्रमाणावर सदनिका अथवा मालमत्ता मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे.
शहरातील २७ दुय्यम निबंधक कार्यालयांमधून २३ ते २६ सप्टेंबर या चार दिवसांमध्ये दर दिवशी दीड हजारांहून अधिक दस्तांची नोंदणी झाली. तसेच २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत १३०० ते १५०० दस्तांची नोंद करण्यात आली. शहरात अन्य दिवशी सुमारे ८०० ते १ हजार दस्तांची नोंद होते. मात्र, यंदा नवरात्रात दस्तांची नोंदणी दीडपटीने वाढली, अशी माहिती पुणे शहर सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.
तारीख : दस्त नोंदणी
२१ सप्टेंबर : ८७
२३ सप्टेंबर : १६९५
२४ सप्टेंबर : १४२६
२५ सप्टेंबर : १५४३
२६ सप्टेंबर : १७८२
२७ सप्टेंबर : ३८४
२८ सप्टेंबर : २३१
२९ सप्टेंबर : १२४३
३० सप्टेंबर : १५११
१ ऑक्टोबर : १३३२
एकूण : ११२३४
एकूण महसूल : ४०७ कोटी १२ लाख ३ हजार ८०९ रुपये