राजगड तालुका नामकरणाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
By राजू इनामदार | Updated: August 22, 2025 14:21 IST2025-08-22T14:16:45+5:302025-08-22T14:21:55+5:30
‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय’च्या जयघोषाने आणि हलगी, तुरारीच्या निनादाने राजगड-तोरण्याची दरी खोरे दुमदुमून गेले.

राजगड तालुका नामकरणाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
वेल्हे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची कर्मभूमी आणि हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका म्हणून करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. या निर्णयाचे स्वागत गुरुवारी (२१ ऑगस्ट) वेल्हे बुद्रूक (ता. राजगड) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक रिवाजात करण्यात आले.
‘हर हर महादेव’, ‘जय शिवराय’च्या जयघोषाने आणि हलगी, तुरारीच्या निनादाने राजगड-तोरण्याची दरी खोरे दुमदुमून गेले. यावेळी परिसरातील शेकडो मावळे, रहिवासी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका म्हणून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रतीक्षा होती. अखेर बुधवारी (२० ऑगस्ट) केंद्र सरकारने या नामकरणास मंजुरी दिली. यामुळे आता देशासह जगाच्या नकाशावर ‘राजगड तालुका’ नाव विराजमान होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून मावळा जवान संघटना आणि तत्कालीन शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश वालगुडे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. वालगुडे यांनी तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही याबाबत मागणी केली होती.
राजगड, तोरणा, पानशेत आणि सिंहगड परिसरात सर्वपक्षीय नेते, शिवप्रेमी संघटना आणि मावळ्यांनी या निर्णयाचे ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजी आणि साखर-पेढे वाटून जल्लोषात स्वागत केले. वेल्हे बुद्रूक पंचायत समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर, मावळा जवान संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, राजगड पंचायत समितीच्या सहायक गटविकास अधिकारी एस. टी. तेलंग, वेल्हे पोलिस ठाण्याचे अंमलदार आकाश पाटील, भाजपचे राज्य परिषदेचे सदस्य बाळासाहेब गरुड, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, तालुकाध्यक्ष राजू रेणुसे, आनंद देशमाने, सुनील जागडे, बाळासाहेब सणस, इंद्रजीत जेधे, शुभम बेलसरे, अंकुश पासलकर, लक्ष्मण भोसले, खंडू गायकवाड, रामभाऊ राजीवडे आदी उपस्थित होते.
ऐतिहासिक निर्णय
पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष भगवान पासलकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या जगातील पहिल्या हिंदवी स्वराज्य या स्वतंत्र लोकशाहीवादी राष्ट्रातील राजगड हा पहिला तालुका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.”
तालुक्याचा गौरव
या ऐतिहासिक निर्णयामुळे राजगड तालुका जगाच्या नकाशावर स्वतःची ओळख निर्माण करणार आहे. भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनीही या निर्णयाचे स्वागत करत केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले.