पुरंदरच्या सीताफळ बागांना उन्हाळी बहराची चाहूल; छाटणी पूर्ण, पाण्याची चिंता कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 18:35 IST2026-03-13T18:33:30+5:302026-03-13T18:35:08+5:30
पुरंदर तालुक्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने पुरेसे पाणी न मिळालेल्या बागांतील फुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता

पुरंदरच्या सीताफळ बागांना उन्हाळी बहराची चाहूल; छाटणी पूर्ण, पाण्याची चिंता कायम
भुलेश्वर : सीताफळ बागांचे आगार म्हणून ओळख असलेल्या पुरंदर तालुक्यात सध्या सीताफळ बागांना उन्हाळी बहराची चाहूल लागली असून बागांची छाटणी पूर्ण झाली आहे. गेल्यावर्षीची तोडणी झाल्यानंतर बागा तापण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. आता छाटणी आणि इतर मशागतीची कामे सुरू झाली आहेत.
एका झाडाची छाटणी करण्यासाठी साधारणपणे २० ते ४० रुपये खर्च येत असून झाडे खांदण्यासाठी २० ते २५ रुपये खर्च येतो. त्यानंतर बागेत शेणखत टाकून पाणी देण्यासाठी वाफे काढले जात आहेत. काही शेतकरी महाशिवरात्री व गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पाणी सोडतात. मात्र, उन्हाळ्यातील कडक परिस्थितीमुळे फूल व फळगळ मोठ्या प्रमाणात होत असल्याने बागांचे व्यवस्थापन करणे आव्हानात्मक ठरत आहे.
पुरंदर तालुक्यात तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने पुरेसे पाणी न मिळालेल्या बागांतील फुलांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असलेले अनेक शेतकरी उन्हाळी बहर घेण्याचे धाडस करत नाहीत.
उन्हाळी बहरातील सीताफळे आकाराने लहान असली तरी श्रावण महिन्यात बाजारात येत असल्याने त्यांना चांगला दर मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. मात्र, जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास पिठ्या ढेकूणसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीतीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पुरंदर तालुका सीताफळ बागांसाठी प्रसिद्ध असून सासवड येथे या फळाची मोठी बाजारपेठ आहे. येथून पुणे, मुंबईसह देशातील विविध भागांत सीताफळांची विक्री केली जाते. तसेच तालुक्यात सीताफळाचा गर काढण्याचे उद्योगही सुरू असल्याने लहान फळांनाही बाजारभाव मिळतो. दरम्यान, पुरंदर उपसा जलसिंचन योजना उन्हाळ्यात नियमित सुरू राहिल्यास सीताफळ उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.