भीमाशंकर मंदिराशेजारील घरांच्या स्थलांतराचा प्रस्ताव; जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येणार १० एकर जागा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:16 IST2026-03-10T15:16:19+5:302026-03-10T15:16:46+5:30
या प्रस्तावामुळे सुमारे ११० घरांना सुनियोजित ठिकाणी हलविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.

भीमाशंकर मंदिराशेजारील घरांच्या स्थलांतराचा प्रस्ताव; जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येणार १० एकर जागा
पुणे : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील गावठाण शेजारील दीडशे मीटर लांब जागेत हलविण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव ग्रामस्थांपुढे ठेवण्यात आला असून, ग्रामस्थांच्या प्रतिसादानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामुळे सुमारे ११० घरांना सुनियोजित ठिकाणी हलविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी हा प्रस्ताव स्वीकारल्यानंतरच हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत हा प्रस्ताव ग्रामस्थांपुढे ठेवला आहे. दोन वर्षांनंतर होऊ घातलेल्या कुंभमेळ्याला दररोज सुमारे एक लाख भाविक मंदिराला भेट देण्याची शक्यता आहे. मंदिरासभोवती असलेल्या गावामुळे या परिसरात चेंगराचेंगरी तसेच आगीच्या घटना घडू शकतात. या ठिकाणी असलेल्या ११० घरांमुळे मंदिराला येण्यासाठीचा रस्ता अरुंद होतो. त्यामुळे या ठिकाणी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सध्याच्या दाट वस्तीमुळे अग्निशमन दलाच्या गाड्या आणि रुग्णवाहिकांसाठी आवश्यक असलेला आपत्कालीन प्रवेश मार्ग तयार करणे शक्य होत नाही.
ही स्थिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियमांविरोधी. हे भाविकांसाठी असुरक्षित आहे. भीमाशंकर मंदिराचा परिसर हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असून, या भागातील मानवी वस्तीमुळे प्रक्रिया न केलेले सांडपाणी, घनकचरा निर्माण होतो तसेच शेकरूच्या अधिवासारवरही परिणाम होत आहे. त्यामुळे या अभयारण्याची परिसंस्था धोक्यात आहे.
हे लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या गावठाणाचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव या ग्रामस्थांपुढे ठेवला आहे. या ११० घरांना स्थलांतरित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साडेदहा एकर खासगी जागा निश्चित केली आहे. ही जागा त्याच परिसरात असल्याने ग्रामस्थांसाठी त्यांच्या पारंपरिक जागा कायम राहाणार आहे. या प्रस्तावावर ग्रामस्थांनी चर्चा करून आपले मत जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले आहे.