बारामतीत शाळेच्या वेळेत खासगी शिकवणी; जिल्हाभर तपासणीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:22 IST2026-03-14T16:18:15+5:302026-03-14T16:22:01+5:30

- बारामती तालुक्यातील एका शाळेत शिकणारा विद्यार्थी शाळेच्या वेळेत खासगी शिकवणीला जात असल्याचा प्रकार समोर आला.

pune news private tutoring during school hours in Baramati; District-wide inspection ordered | बारामतीत शाळेच्या वेळेत खासगी शिकवणी; जिल्हाभर तपासणीचे आदेश

बारामतीत शाळेच्या वेळेत खासगी शिकवणी; जिल्हाभर तपासणीचे आदेश

पुणे : प्राथमिक शाळेतील विद्यार्थी शाळेच्या वेळेतच खासगी शिकवणीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात उघडकीस आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शाळेच्या वेळेत विद्यार्थी खासगी शिकवणीला जात असल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत; तसेच यासंदर्भात संपूर्ण जिल्ह्यातील शाळांची तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात असतानाच बारामती तालुक्यातील एका शाळेत शिकणारा विद्यार्थी शाळेच्या वेळेत खासगी शिकवणीला जात असल्याचा प्रकार समोर आला. एका नागरिकाने केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून, त्यामुळे शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांच्या जबाबदारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शाळेत उपस्थिती नोंदवून विद्यार्थी प्रत्यक्षात खासगी शिकवणीला जात असल्यास त्यातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. शाळेच्या वेळेत एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, तपासणीदरम्यान केवळ बारामती तालुक्यातच नव्हे, तर इंदापूर आणि शिक्रापूर परिसरातही असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी नाईकडे यांनी अशा प्रकारांना थेट मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरत कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

शाळेत हजेरी लावून विद्यार्थी खासगी शिकवणीला जात असल्याचे प्रकार तातडीने थांबवावेत. संबंधित शिक्षकांकडून खुलासा घ्यावा, तसेच प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी शाळांची तपासणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

Web Title : बारामती: स्कूल के समय निजी ट्यूशन; पूरे जिले में जांच के आदेश

Web Summary : बारामती में स्कूल समय में निजी ट्यूशन में भाग लेने वाले छात्र; पूरे जिले में निरीक्षण के आदेश। उल्लंघन पर प्रधानाध्यापकों पर कार्रवाई; छात्रों की सुरक्षा संबंधी चिंताएं बढ़ीं। जांच शुरू।

Web Title : Baramati: Private tuition during school hours; district-wide inspection ordered.

Web Summary : Baramati students attending private tuition during school hours prompts district-wide inspection orders. Headmasters face action for violations; student safety concerns rise. Inquiry launched.