'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 19:26 IST2025-11-10T19:25:30+5:302025-11-10T19:26:38+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले

'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
पुणे : कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आल्याची चर्चा होती. मात्र आज पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्यातील बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या वादग्रस्त जमीन व्यवहारावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते.
ते पुढे म्हणाले, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरण वेगवेगळे आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यावेळी पत्रकार परिषदेत पोलिसांकडून बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कागद पत्रांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
पुण्यातील बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांची पत्रकार परिषद #Pune#ParthPawar#SheetalTejwani#Amediapic.twitter.com/P1OeNUr5EP
— Lokmat (@lokmat) November 10, 2025
दरम्यान , कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ या कंपनीचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने या जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणाचे राजकीय परिणाम दिसून येऊ शकतात. विरोधकांनी या प्रकरणावरून जोरदार टीका सुरू केली असून, पवार कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत जनतेसमोर त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.