PMC Election : प्रभाग रचनेत किरकोळ बदल, हरकतीच्या सुनावणीचा केवळ फार्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 10:38 IST2025-10-05T10:38:15+5:302025-10-05T10:38:44+5:30
- पुणे महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

PMC Election : प्रभाग रचनेत किरकोळ बदल, हरकतीच्या सुनावणीचा केवळ फार्स
पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून पाच हजार ९२२ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ १ हजार ३२९ हरकती पूर्णतः तर ६९ हरकती अंशत: मान्य करण्यात आल्या आहेत. तब्बल ४ हजार ५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. ४१ पैकी २८ प्रभागांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आठ प्रभागांची नावे बदलली असून, केवळ पाच प्रभागांमध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे हरकती सूचनांच्या सुनावणीचा केवळ दिखावा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव-कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. या प्रारूप रचनेवर आलेल्या ५ हजार ९२२ हरकती आणि सूचना आल्या आहेत. या हरकती सूचनांवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांच्यापुढे झाली. त्यात सर्वाधिक हरकती प्रभागाच्या नैसर्गिक सीमारेषा आणि अनुकूल असलेला भाग जोडावा, प्रतिकूल असलेला भाग काढून टाकावा या होत्या. सीमारेषा आखताना नैसर्गिक हद्दी विचारात घेतल्या नाहीत. नॅशनल हायवे, शहरातील मोठे प्रभागाची व्याप्ती प्रचंड मोठी झाली आहे.
रस्ते, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रूळ हे ओलांडून प्रभाग केले आहेत. प्रभाग रचना करताना भौगोलिकदृष्ट्या काही तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांची शक्यतोवर विभाजन करू नये असे राज्य सरकारचे निकष असतानासुद्धा मोठ्या प्रमाणात वस्त्याच्या वस्त्या वगळून टाकल्या आहेत. त्यामुळे त्या प्रभागात एससी, एसटीचे आरक्षण पडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आहे, या हरकतीचा सुनावणी मध्ये समावेश होता. त्यानंतर नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे हरकती सूचनांवरील सुनावणीनंतरचा अहवाल पाठविला होता. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पुणे महापालिकांच्या अंतिम प्रभाग रचनेचे सादरीकरण करण्यात आले होते. त्यानंतर पुणे महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानंतर पालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. निवडणूक आयोगाने काही प्रभागांमध्ये बदल केले असून, प्रभागांची नावेही बदलली आहेत.
प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रूक- केशवनगर- साडे सतरा नळीमधील थिटे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक ४ खराडी - वाघोलीला जोडला आहे. त्यामुळे या प्रभागात ६ हजार ५०० लोकसंख्या वाढली आहे. अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रभाग क्रमांक १८ वानवडी - साळुंके विहार या प्रभागाचा शिंदे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क - घोरपडी- मुंढवा या प्रभागाला जोडण्यात आला आहे. प्रारूप रचनेमध्ये शिंदे वस्तीचे रस्त्याने विभाजन झाले होते. प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा चा मगरपट्टा सिटी रस्त्याच्या समोरील भाग हा प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडीला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २० बिबवेवाडी - महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून, बिबवेवाडी- शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे. या प्रभागातील के. के. मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर - आंबेगाव - कात्रज या प्रभागाला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे - वडगाव बुद्रूक - आंबेगावचा दाभाडी हा भाग पाच सदस्य प्रभाग ३८ बालाजीनगर - आंबेगाव- कात्रज या प्रभागाला जोडण्यात आला आहे. तसेच कोळेवाडी, जांभूळवाडी हा भागदेखील प्रभाग क्रमांक ३८बालाजी नगर- आंबेगाव - कात्रजला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ३८ बालाजी नगर - आंबेगाव - कात्रजमधील सुखसागर नगरचा भाग प्रभाग ३९ अप्पर सुपर - इंदिरानगरला जोडण्यात आला आहे.
नावे बदललेले प्रभाग पुढीलप्रमाणे; कंसात प्रभागाचे जुने नाव
प्रभाग क्रमांक १ - कळस - धानोरी- लोहगाव उर्वरित (कळस - धानोरी)
प्रभाग क्रमांक १४ - कोरेगाव पार्क - घोरपडी - मुंढवा (कोरेगाव पार्क - मुंढवा)
प्रभाग क्रमांक १५ - मांजरी बुद्रुक- केशवनगर- साडेसतरा नळी ( मांजरी बुद्रुक - साडेसतरा नळी)
प्रभाग क्रमांक १७ - रामटेकडी - माळवाडी- वैदूवाडी (रामटेकडी - माळवाडी)
प्रभाग क्रमांक २० - शंकर महाराज मठ - बिबवेवाडी (बिबवेवाडी - महेश सोसायटी)
प्रभाग क्रमांक २४ - कसबा गणपती - कमला नेहरू हॉस्पिटल - के. ई. एम. हॉस्पिटल (कमला नेहरू हॉस्पिटल - रास्ता पेठ)
प्रभाग क्रमांक २६ - घोरपडे पेठ - गुरुवार पेठ - समताभूमी (गुरुवार पेठ - घोरपडे पेठ)
प्रभाग क्रमांक ३८ - बालाजीनगर - आंबेगाव - कात्रज (आंबेगाव - कात्रज).