पुण्याचा वेग वाढणार; अर्थसंकल्पात मेट्रो, महामार्ग आणि रेल्वेसाठी हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:52 IST2026-03-07T16:51:37+5:302026-03-07T16:52:27+5:30
अर्थसंकल्प 2026: पुणे शहरासाठी मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा

पुण्याचा वेग वाढणार; अर्थसंकल्पात मेट्रो, महामार्ग आणि रेल्वेसाठी हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी
पुणे - राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे शहर आणि परिसरासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुणे आणि औद्योगिक पट्ट्यांमधील वाहतूक सुलभ होणार असून शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.
तळेगाव–चाकण उन्नत मार्ग
अर्थसंकल्पात तळेगाव ते चाकण या औद्योगिक पट्ट्याला जोडणाऱ्या उन्नत मार्गासाठी ६४९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा २५ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यामुळे चाकण MIDC परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे.
चाकण–शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरण
चाकण–शिक्रापूर मार्गाच्या २८ किमी लांबीच्या महामार्गाचे महापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी ५३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे पुणे–नगर आणि पुणे–नाशिक मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.
शिरूर–छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्ग
पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास जलद करण्यासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १९२ किमी लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत १४,८८६ कोटी रुपये असून सध्या त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.
हडपसर–यवत महामार्ग प्रकल्प
हडपसर ते यवत या ३१.५ किमी लांबीच्या महामार्गासाठी ५२८२ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे–सोलापूर मार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
देहू येथे विकास आराखडा
संत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्थळ देहू येथे विकास आराखडा तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन वाढवणे आणि परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.
पुणे–लोणावळा अतिरिक्त रेल्वे मार्ग
पुणे–लोणावळा दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग उभारण्याच्या ५१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव औद्योगिक पट्ट्यांना मोठा फायदा होणार आहे.
पुणे मेट्रो टप्पा-२ विस्तार
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील अनेक मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये अडकवासला – स्वारगेट , हडपसर – खडकवासला (उपमार्ग) , हडपसर – लोणी काळभोर, हडपसर बस डेपो – सासवड रोड , रामवाडी – वाघोली या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय येरवडा–कात्रज आणि हिंजवडी–सिंहगड रोड या सुमारे ५४ किमी दुहेरी मार्गांचा अहवाल तयार करण्यात येत आहे.
पुणे–शिरूर महामार्ग
पुणे ते शिरूर दरम्यान ५३ किमी लांबीच्या महामार्गासाठी ७५१४ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे-नगर मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.