Pune news : तक्रारवाडी टोलनाक्यावरून संतापाचा उद्रेक; ‘सवलत नव्हे, पूर्ण टोलमाफीच हवी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 14:49 IST2026-02-24T14:46:36+5:302026-02-24T14:49:00+5:30
- मार्चमध्ये वसुलीपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Pune news : तक्रारवाडी टोलनाक्यावरून संतापाचा उद्रेक; ‘सवलत नव्हे, पूर्ण टोलमाफीच हवी’
जेजुरी : आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्याचे काम पूर्ण झाले आहे. मार्च महिन्यापासून येथे टोलवसुली सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, पालखी महामार्गालगत जमीन दिलेल्या बाधित शेतकऱ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी या टोलनाक्याला तीव्र विरोध दर्शवत “आम्हाला सवलत नको, तर पूर्ण टोलमाफी हवी,” अशी ठाम भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात १६ सप्टेंबर २०२५ रोजी सासवड येथील विश्रामगृहात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. त्या वेळी शेतकऱ्यांनी पूर्ण टोलमाफीची मागणी केली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी टोलनाक्याच्या २० किलोमीटर परिसरातील शेतकऱ्यांना दरमहा ३५० रुपयांत पास देण्याचा प्रस्ताव मांडला; मात्र हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावत पूर्ण टोलमाफीवर ठाम भूमिका कायम ठेवली.
त्याच बैठकीत बोरावके मळा ते चंदन टेकडी बाह्यवळण दरम्यान दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी खळद ग्रामस्थांनी केली होती. अधिकाऱ्यांनी दहा ठिकाणी उड्डाणपूल प्रस्तावित असल्याचे सांगितले होते. खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांच्या टोलमाफीचा सकारात्मक विचार करण्याच्या सूचना देत केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
दरम्यान, पाच महिने उलटूनही या मागण्यांबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. अलीकडेच जेजुरी येथील शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांची भेट घेतली असता, पुन्हा २० किलोमीटर परिसरासाठी सवलतीच्या पासचा प्रस्ताव व उड्डाणपूल उभारणीबाबत आश्वासन देण्यात आले. त्यामुळे “पुन्हा तेच आश्वासन” दिले जात असल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
दरम्यान, बाधित शेतकरी योगेश कामथे यांनी इशारा देताना सांगितले, “पाच महिन्यांपूर्वी दिलेल्या आश्वासनांमध्ये कोणतीही प्रगती दिसत नाही. मार्चमध्ये टोलवसुली सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने ठोस निर्णय जाहीर करावा. टोलमाफीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” तक्रारवाडी (ता. पुरंदर) येथे उभारण्यात आलेल्या टोलनाक्यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या कोर्टात निर्णय
माजी जिल्हा परिषद सदस्या सारिका इंगळे तसेच बाधित शेतकरी योगेश कामथे यांनी खासदार सुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे स्थानिकांना पूर्ण टोलमाफी देण्याची मागणी केल्याचे सांगितले. “या भागातील नागरिकांनी रस्त्यासाठी आपली जमीन दिली आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण टोलमाफी मिळणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही केली आहे.