जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध, आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 09:33 IST2025-08-14T09:32:58+5:302025-08-14T09:33:34+5:30
दौंड, बारामती, शिरुर तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्री ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले

जिल्ह्यात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध, आदेश जारी
पुणे : जिल्ह्यात विनापरवाना ड्रोनने चित्रीकरण करणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलिस ठाण्यास कळवून संबंधित प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. हे आदेश १२ ऑगस्टपासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील.
जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दौंड, बारामती, शिरुर तालुक्यांच्या परिसरामध्ये रात्री ड्रोन उडत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी करून इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करून पोलिसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.